वसंत गितेंच्या नाराजीकडे स्थानिक नेत्यांचे दुर्लक्ष
By admin | Published: November 5, 2014 12:06 AM2014-11-05T00:06:56+5:302014-11-05T00:07:20+5:30
समर्थक नगरसेवकही गप्प : पदाधिकाऱ्यांचे राजीनामासत्र संपुष्टात
नाशिक : ‘वसंत गिते यांनी पदाचा राजीनामा दिलेला आहे, पक्षाचा नाही. आपण त्यांची नाराजी निश्चित दूर करू’ असे सांगून पक्षातील गिते समर्थकांना थोपवून धरण्यात यशस्वी झालेले महापौर व स्थायी समिती सभापतींनी दुसऱ्या दिवशी मात्र गिते यांच्याकडे पाठ फिरवित त्यांची नाराजी दूर करण्याऐवजी यासंदर्भातील निर्णय पक्षप्रमुख राज ठाकरे हेच घेतील असे सांगून हात झटकले आहेत, तर दुसरीकडे पक्षानेही गिते यांच्या नाराजीकडे गांभीर्याने न घेतल्याने त्यांच्या समर्थकांत चुळबुळ सुरू झाली आहे.
निवडणुकीचा कोणताही माहौल दृष्टिपथात नसताना वसंत गिते यांनी पक्षाच्या पदाचा राजीनामा देण्यामागचे गौडबंगाल स्पष्ट होऊ शकले नाही; परंतु त्यांच्या समर्थक नगरसेवकांची संख्या लक्षात घेता, महापालिकेतील मनसेच्या सत्तेला ते धोका पोहोचवू शकतात अशी भीती सत्ताधाऱ्यांना लागून राहिली आहे. त्यामुळे सोमवारी गिते यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर महापौर अशोक मुर्तडक व स्थायी समिती सभापती राहुल ढिकले यांनी तातडीने मनसे नगरसेवकांची बैठक घेऊन शिरगणती केली व त्यांच्यातील नाराजी म्हणजेच वसंत गिते यांच्याविषयीची भावना जाणून घेतली. गिते यांच्या समर्थनार्थ त्र्यंबकेश्वर येथील सात नगरसेवकांनी पक्षाकडे राजीनामा पाठविण्याचे धाडस केले. त्यामानाने नाशिक या गिते यांच्या होमपिचवर एकाही नगरसेवकाने तसे धाडस न केल्याने एक तर गिते यांच्या पाठीशी एकही नगरसेवक नसल्याचा अर्थ काढला जात असून, दुसरीकडे गिते यांची नाराजी काढली जाणारच आहे तर राजीनामा कशासाठी, असा विचार करूनच बहुधा नगरसेवकांनी गप्प राहणे पसंत केल्याची चर्चा पक्षात होत आहे. गिते यांची समजूत काढू असा शब्द नगरसेवकांना देणारे महापौर मुर्तडक व स्थायी समिती सभापती राहुल ढिकले यांनी मात्र दुसऱ्याच दिवशी त्याकडे दुर्लक्ष केले. विशेष म्हणजे, गिते यांची सेनेच्या व भाजपाच्या नेत्यांनी भेट घेऊन त्यांना पक्षप्रवेशाची खुली आॅफर दिल्यानंतरही मनसेच्या स्थानिक नेत्यांनी यासंदर्भात पावले न उचलण्याची बाब पक्ष कार्यकर्त्यांना खटकली आहे. चोवीस तासांपेक्षा अधिक कालावधी उलटूनही राजीनाम्याची पक्षाच्या नेत्यांनी दखल घेतलेली नसल्याची चर्चा कार्यकर्ते करीत असून, त्यामुळे गिते यांच्या पदाच्या राजीनाम्यानंतर अन्य पक्ष पदाधिकाऱ्यांनी चालविलेले राजीनामा सत्रही आपोआप संपुष्टात आले आहे.