शब्दसुरांच्या मैफलीने वसंत व्याख्यानमालेचा समारोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:11 AM2021-06-01T04:11:15+5:302021-06-01T04:11:15+5:30
नाशिक : महिनाभर चाललेल्या डिजिटल वसंत व्याख्यानमालेचा समारोप ‘नमन’ या सांगीतिक सोहळ्याने झाला. शब्दसुरांच्या साक्षीने उपस्थितांनी ज्येष्ठ तबलावादक स्व. ...
नाशिक : महिनाभर चाललेल्या डिजिटल वसंत व्याख्यानमालेचा समारोप ‘नमन’ या सांगीतिक सोहळ्याने झाला. शब्दसुरांच्या साक्षीने उपस्थितांनी ज्येष्ठ तबलावादक स्व. नवीन तांबट आणि ध्वनी संयोजक अरविंद म्हसाने यांच्या स्मृतीही जागविण्यात आल्या.
अखेरच्या दिवशी अमोल पाळेकर आयोजित ‘नमन’ या भावमधुर गाण्यांच्या कार्यक्रमाने व्याखानमालेचा समारोप सुमधुर झाला. तत्पूर्वी उपस्थित गायकांनी एकापेक्षा एक भावमधुर गाण्यांची पेरणी करून मैफलीत रंग भरला. पाळेकर यांनी नवीन तांबट यांच्या स्मृतींना उजाळा दिला. वादकाचा मुलगा म्हणून तांबटसरांनी आपल्यास वादक म्हणून घडविले, गायकास साथ देताना एकलवादक नसावे, तर साथसंगत असावी, असा मंत्रही दिल्याचे नमूद केले. नव्या कलावंतांना प्रोत्साहित करण्यासाठी तांबटसर आग्रही होते, असे मत मीना परुळेकर यांनी व्यक्त केले. अरविंद म्हसाने हे आनंद अत्रे यांचे मामा. व्यावसायिक जीवनात करिअर करण्याची प्रेरणा मिळाल्याचे अत्रेंनी सांगितले. बेस्ट गिटारवादक असलेल्या अरविंद म्हसाने यांनी नाशिकचा पहिला ऑर्केस्ट्रा मुंबईत सादर करण्याचा मान मिळविल्याची आठवण संजय पुणतांबेकर यांनी सांगितली. गतस्मृतींना उजाळा मिळत असताना स्वर आणि सुरांची मैफलही रंगली. मालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी यांनी प्रास्ताविक केले, तर चिटणीस संगीता बाफना यांनी आभार मानले.
इन्फो
‘नमन’ला रसिकांची दाद
आनंद अत्रे यांची प्रार्थना, कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे, निघालो घेऊन दत्ताची पालखी, तर मीना परुळेकर यांनी कानडाऊ विठ्ठलू, या चिमण्यांनो या गीतांनी कार्यक्रमाला भावभक्तीची किनार दिली. विद्या कुलकर्णी यांच्या बोल रे पपिहरा, देव जरी मज, तरुण आहे रात्र अजुनी या गाण्यांनी रंग भरले. या गायकांच्या सुरांना साथ मिळाली ती वादक अनिल धुमाळ, सुधीर सोनवणे, आनंद अत्रे आणि अमोल पाळेकर यांची. किरण गायधनी यांनी ध्वनी, तर धनेश जोशी यांनी निवेदकाची जबाबदारी सांभाळत कार्यक्रम उत्तरोत्तर रंगतदार केला.