तालमींसाठी वस्तादांनी ठोकला शड्डू!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:24 AM2021-02-06T04:24:04+5:302021-02-06T04:24:04+5:30
नाशिक शहरात नाशिक आणि पंचवटी गावठाणात मोठ्या प्रमाणात जुन्या तालमी आहेत. या तालमीतून अनेक नामांकित पहिलवान घडले असून त्यांनी ...
नाशिक शहरात नाशिक आणि पंचवटी गावठाणात मोठ्या प्रमाणात जुन्या तालमी आहेत. या तालमीतून अनेक नामांकित पहिलवान घडले असून त्यांनी नाशिकचे नाव उंचावलेले आहे. मात्र, नाशिकच्या क्रीडा वैभव असलेल्या या तालमींची अवस्था बिकट झाली आहे. ऐतिहासिक आणि क्रीडा वारसा ठरू शकलेल्या तालमींना घरघर लागली आहे. मनपा प्रशासनाचे त्याकडे अक्ष्यम दुर्लक्ष होत आहे. वास्तविक, खेळ आणि खेळाडूंना प्रोत्साहन देणे हे महापालिकेचे काम असून त्यामुळे राज्य शासनानेदेखील तसा नियम केला आहे. ९ मार्च १९९८ च्या शासन निर्णयानुसार क्रीडा क्षेत्रासाठी पाच टक्के रक्कम राखीव ठेवणे बंधनकारक आहे. मात्र तसे होताना दिसत नाही. तरतूद अपुरी केली जाते आणि त्याचा विनियोगदेखील क्रीडा क्षेत्रासाठी केला जात नाही. २०१४-१५ पासून आतापर्यंतचा विचार केला तर अपेक्षित तरतूद किंवा खर्चदेखील महापालिकेने केलेला नाही. त्यामुळे अशी तरतूद करावी आणि शहरातील मोहन मास्तर तालीम संघ, दांडेकर दीक्षित तालीम संघ, छपरीची तालीम, मधली होळी तालीम, ओकाची तालीम संघ, बंडू वस्ताद, साईबाबा, विराम वस्ताद, घनकर गल्ली, वाघाडी तालीम संघ, सरदार रास्ते आखाडा तालीम संघ आणि छत्रपती शाहू महाराज तालीम संघ अशा १२ तालमी असून त्यांची अवस्था बिकट आहे. त्यामुळे त्यांना महापालिकेने आर्थिक पाठबळ देऊन सहकार्य करावे अशी मागणी अभय दिघे, हिरामण वाघ, सचिन ढोबळे, विशाल राजपूत, संतोष बच्छाव, संतोष आखाडे, विशाल सौदे, रमेश चाटोरीकर, शुभम ठाकरे, ॲड. सलीम सय्यद यांच्यासह अन्य तालीम प्रमुखांनी शिवसेनेच्या माध्यमातून केली आहे.
इन्फो..
पहिलवानांना हवे आरोग्य विमा कवच
तालमींमध्ये येणारे बहुतांश खेळाडू हे सर्वसाधारण कुटुंबातील असतात. तसेच क्रीडा स्पर्धांची तयारी करताना किंवा सराव करताना ते दुखापतग्रस्त होतात. कित्येकदा त्यांना उपचार आणि शस्त्रक्रियेसाठी मोठा खर्च येतो. परंतु तो खर्चही करता येत नसल्याने अशा खेळाडू पहिलवानांना खेळच सोडावा लागतो. तसे होऊ नये यासाठी खेळाडूंना आरोग्य विमा कवच उपलब्ध करून द्यावे, अशीही मागणी करण्यात आली आहे.