वटपौर्णिमेनिमित्त पूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:12 AM2021-06-25T04:12:39+5:302021-06-25T04:12:39+5:30
नाशिक : वटपौर्णिमेच्या दिवशी शहरातील महिलांनी गुरुवारी (दि. २४) उत्साहात सौभाग्याचा हा उत्सव साजरा केला. त्यानिमित्ताने पारंपरिकरित्या वडाचे ...
नाशिक : वटपौर्णिमेच्या दिवशी शहरातील महिलांनी गुरुवारी (दि. २४) उत्साहात सौभाग्याचा हा उत्सव साजरा केला. त्यानिमित्ताने पारंपरिकरित्या वडाचे मनोभावे पूजन करण्यात आले.
‘सातही जन्म हाच पती मिळो’ ही इच्छा, तसेच पतीच्या दीर्घायुष्यासाठीची मनोकामना करण्यात आली. पूर्वीच्या काळात महिला सतत बंदिस्त घरात रहात असल्याने आरोग्याच्या समस्या निर्माण होत असत. त्यानिमित्ताने स्त्रिया बाहेर पडायच्या आणि वटवृक्षाला प्रदक्षिणा मारल्यावर त्यांच्या शरीरातील प्राणवायूचे प्रमाण वाढत होते. त्यामुळेच वटसावित्रीच्या पूजेत प्रदक्षिणांची प्रथा पडली. गत दीड वर्षापासून देखील सर्व समाज कोरोनाच्या धास्तीने घरातच अडकून पडल्याने वटपौर्णिमेच्या निमित्ताने परंपरा कायम ठेवली. बहुतांश ठिकाणी महिलांनीच सर्व पूजाविधी केली. सध्या प्रत्येक सण हा प्रत्यक्ष साजरा होण्यापेक्षा सोशल मीडियावर जास्त साजरा होताना दिसतो. त्यामध्ये आता वटपौर्णिमेचाही समावेश झाल्याचे चित्र दिसले. महिला वटसावित्री व्रताची माहिती फोटो एकमेकींना पाठवून,तसेच पूजा करतानाचे सेल्फी पाठवून वटपौर्णिमेचा दिवस साजरा केला. नियमितपणे सलवार कमीजमध्ये राहणाऱ्या महिलांनी देखील वटपौर्णिमेच्या निमित्ताने पारंपरिक सहावार साड्या नेसून नथ, बांगड्यांचा साजशृंगार करुन पारंपरिक वेशातील सेल्फी काढण्याचा देखील आनंद लुटला. कोरोनाचे प्रमाण कमी झाले असले तरी कोरोना गेलेला नसल्याने अनेक महिलांनी यंदा केवळ वडाच्या झाडाचे दर्शन घेऊन देखील परंपरेचे पूजन केले.