अखंड सौभाग्याची मनोकामना करत वटपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 12:45 AM2019-06-17T00:45:34+5:302019-06-17T00:46:01+5:30
सौभाग्य अलंकार लेवून आणि पैठणी नेसून हातात पूजेची थाळी घेऊन रविवारी (दि़१६) सकाळी ८ वाजेपासून ते दुपारी दोन वाजेपर्यंत शहरातील विविध मंदिरे व मुख्य रस्त्यालगत असलेल्या वटवृक्षाखाली सुवासिनी महिलांची वटपौर्णिमेच्या पूजनासाठी लगबग सुरू होती़ यावेळी महिलांनी अखंड सौभाग्याची मनोकामना करीत जन्मोजन्मी हाच पती मिळू दे अशी प्रार्थना केली़
नाशिक : सौभाग्य अलंकार लेवून आणि पैठणी नेसून हातात पूजेची थाळी घेऊन रविवारी (दि़१६) सकाळी ८ वाजेपासून ते दुपारी दोन वाजेपर्यंत शहरातील विविध मंदिरे व मुख्य रस्त्यालगत असलेल्या वटवृक्षाखाली सुवासिनी महिलांची वटपौर्णिमेच्या पूजनासाठी लगबग सुरू होती़ यावेळी महिलांनी अखंड सौभाग्याची मनोकामना करीत जन्मोजन्मी हाच पती मिळू दे अशी प्रार्थना केली़
शहरात ठिकठिकाणी भरजरी साड्या नेसून आणि सौभाग्यालंकार लेवून वडाच्या झाडाखाली पुरोहितांच्या मार्गदर्शनाखाली वटपूजन करण्यात आले़ सौभाग्यालंकार दान करीत सुवासिनी महिलांनी एकमेकींना हळदी-कुंकू लावून वाण दिले.तसेच वडाच्या खोडाला सात फेऱ्या मारीत सूतधागा गुंडाळीत पती आणि आपल्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली़ त्याचप्रमाणे जन्मोजन्मी हाच पती लाभू दे अशी प्रार्थनादेखील केली़ काही ठिकाणी अपार्टमेंटमध्ये वडाच्या झाडांची कमतरता असल्याने कुंडीमध्ये वडाची फांदी लावून पूजन करण्यात आले़ विशेषत: नववधूंनी साजशृंगार करून वटपौर्णिमेच्या पूजेत उत्साहाने सहभाग घेतला़
काही ठिकाणी ज्येष्ठ महिलांमधील उत्साह आणि पूजेतील सहभागाचा आनंद उल्लेखनीय होता. सिडको, इंदिरानगर भागात स्वामी समर्थ केंद्राच्या आवारात वटपौर्णिमेसाठी मोठी गर्दी दिसून आली़
पूजेसाठी आंब्याचे वाण
वटसावित्री पौर्णिमेला वडाच्या झाडाचे पूजन करताना आम्रफळ अर्पण करण्याची प्रथा आहे़ तसेच पुरोहित आणि ब्राह्मणांना अन्नधान्य व फळे देण्याची परंपरा असल्याने आंब्याच्या फळांना मोठा मागणी होती़ छोट्या आकारातील आंब्यांचा दर ५० ते ६० रुपये किलो होता़ तर केशर, हापूस आंब्याचा दर ७० ते १०० रुपये होता़ त्याचप्रमाणे पूजेचे साहित्य, वडाची फांदी आदींनाही बाजारपेठेत मोठी मागणी होती़