वावीला बंगल्यातून पन्नास हजारांचा ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2019 10:00 PM2019-07-09T22:00:50+5:302019-07-09T22:01:03+5:30
वावी : सिन्नर तालुक्यातील वावी-शहा रस्त्यालगत शेळके वस्तीवर असलेल्या बंगल्याचे कुलूप तोडून चोरट्यांनी प्रवेश करत ५० हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना रविवारी मध्यरात्री घडली. या घटनेत बंगल्यातील सर्व सामान अस्तावस्त फेकून देत चोरट्यांनी पडवीत बांधलेल्या शेळीचाही बळी घेतला.

निमोणीचा मळा ते देवी मळ्यादरम्यान एकनाथ रघुनाथ शेळके यांची वस्ती आहे. शेळके पत्नीसोबत तेथे वास्तव्य करतात. शुक्रवारी (दि.५) शेळके यांनी बॅँकेतून ६० हजार रुपये काढून घरी आणले होते. ही रक्कम त्यांनी घरातील कपाटात ठेवली होती. याच दिवशी सायंकाळी मुलीच्या सासरी तातडीने चाळीसगाव येथे पती-पत्नी घराला कुलूप लावून गेले. शनिवारी सायंकाळी मुलगा पडवीतील शेळीला चारा-पाणी करून गावातील घरी आला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी ९ वाजेच्या सुमारास तो मळ्याकडे आला असता चोरी झाल्याचे त्याला समजले. त्याने वावी पोलिसांना माहिती दिली. सहायक पोलीस निरीक्षक रणजित गलांडे, हवालदार दशरथ मोरे, चालक योगेश शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेतली. कपाटाचा दरवाजा तोडून चोरट्यांनी ५० हजार लांबविले. याप्रकरणी वावी पोलीस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.