वीरगावी शेतकऱ्यांनी महामार्ग रोखला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2018 11:39 PM2018-08-16T23:39:48+5:302018-08-16T23:40:28+5:30
वीरगाव : प्रलंबित केळझर चारी क्र . आठच्या कामास तत्काळ सुरुवात करावी यासाठी लाभक्षेत्रातील शेकडो शेतकºयांनी शहादा-शिर्डी राष्ट्रीय महामार्ग वीरगाव (ता. बागलाण) येथे सुमारे एक तास अडवून ठिय्या आंदोलन केले.
वीरगाव : प्रलंबित केळझर चारी क्र . आठच्या कामास तत्काळ सुरुवात करावी यासाठी लाभक्षेत्रातील शेकडो शेतकºयांनी शहादा-शिर्डी राष्ट्रीय महामार्ग वीरगाव (ता. बागलाण) येथे सुमारे एक तास अडवून ठिय्या आंदोलन केले.
जोपर्यंत काम चालू होत नाही तोपर्यंत महामार्गावरून हलणार नाही, अशी भूमिका यावेळी आंदोलनकर्त्यांनी घेतल्याने प्रशासनासमोर मोठा पेच निर्माण झाला होता; मात्र यावेळी खासदार सुभाष भामरे यांच्या वतीने डॉ. शेषराव पाटील यांनी लघु पाटबंधारे विभागाच्या संबंधित अधिकारी वर्गासमवेत आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन या कामात असलेल्या तांत्रिक अडचणी तत्काळ दूर करण्याचे आश्वासन दिले.
तसेच ३० सप्टेंबरच्या आत कोणत्याही परिस्थितीत चारीच्या कामास सुरुवात करण्याबाबतचे ठोस लेखी आश्वासन शेतकरीवर्गाला दिल्यानंतर अखेर आंदोलन मागे घेण्यात आले. सन १९९९ साली युती शासनाच्या कालावधीत डोंगरेज ते मुळाणे या ११ किमी लांबीच्या चारी क्र . आठच्या कामास सुधारित मान्यता प्राप्त झाली आहे.
या चारीसाठी सुमारे अडीच कोटींचा निधी मंजूर होऊन यातून या चारीचे सुमारे साठ टक्के कामही मार्गी लागले आहे; मात्र गत दहा ते बारा वर्षांच्या कालावधीत उर्वरित कामासाठी शासन पातळीवरून भरीव निधीच उपलब्ध होत नसल्याने हे काम सद्यस्थितीत प्रलंबित अवस्थेत पडून आहे.
सदर काम तत्काळ चालू
व्हावे यासाठी या गावातील शेतकरीवर्गाने अनेक वेळा एकत्र येत कृती समितीच्या माध्यमातून प्रशासनास वारंवार निवेदनही दिले आहेत; मात्र यानंतरही ढिम्म प्रशासन तसूभरही हालत नसल्याने या गावातील जनतेने अखेर स्वातंत्र्यदिनी रस्त्यावर उतरून आपला संताप व्यक्त केला.
पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली सटाणा पोलिसांनी यावेळी चोख बंदोबस्त ठेवला. त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही.महामार्गाच्या दुतर्फा वाहनांच्या रांगाआंदोलनात वीरगाव, डोंगरेज, भंडारपाडे, वनोली, तरसाळी, औंदाणे, कौतिकपाडे, भाक्षी, मुळाणे, चौगाव, रातीर, सुराणे, देवळाणे, वायगाव या गावातील शेकडोंच्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते. यावेळी राष्ट्रीय महामार्गावर या शेकडो आंदोलनकर्त्यांनी ठिय्या दिल्याने प्रशासनाची मोठी धावपळ उडाली. सुमारे एक तास आंदोलनकर्त्यांनी हा महामार्ग अडवून धरल्याने महामार्गाच्या दुतर्फा वाहनांच्या मोठ्या प्रमाणात रांगा लागल्या होत्या. कोणत्याही परिस्थितीत चारीचे काम चालू झालेच पाहिजे, काम चालू होईपर्यंत रस्त्यावरून हलणार नाही, काम चालू करण्याचे लेखी आश्वासन मिळावे, आमदार व खासदार यांनी आंदोलनस्थळी येऊन या कामात असलेल्या अडीअडचणी व प्रगती जनतेला सांगावी यासाठी आंदोलनकर्ते अडून बसल्याने व या कालावधीत प्रचंड घोषणाबाजी करण्यात आल्याने हे आंदोलन चिघळण्याची स्थिती निर्माण झाली होती. यातच या आंदोलनकर्त्यांना आश्वासन देण्यासाठी तब्बल एक तास कोणताही शासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधी सामोरे न गेल्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांच्या माध्यमातून संबंधित अधिकारीवर्गाच्या उपस्थितीत याप्रश्नी ठोस आश्वासन मिळाल्याने आता ३० सप्टेंबरपर्यंत हे काम चालू होण्याची आम्ही वाट पाहणार आहोत. कोणत्याही परिस्थितीत हे काम चालू होणारच, असा शब्द शेषराव पाटील यांनी जनतेला दिला आहे. तो शब्द ते नक्की पाळतील, असा आम्हाला विश्वास आहे.
- नंदकिशोर शेवाळे, अध्यक्ष, चारी क्र . ८ कृती समिती