दिवसा भाजीबाजार, रात्री मद्यबार
By admin | Published: December 16, 2015 12:19 AM2015-12-16T00:19:25+5:302015-12-16T00:21:56+5:30
नागरिक त्रस्त : उपेंद्रनगर भाजी मार्केट हटविण्याबाबत नगरसेवक आक्रमक
सिडको : येथील माणिकनगर, उपेंद्रनगर भागातील अनधिकृत भाजीबाजारातील घाण, कचऱ्यामुळे व रात्रीच्या वेळी याच ठिकाणी टवाळखोरांच्या उपद्रवामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. तसेच याच भाजीबाजारालगत मुख्य रस्त्यावरच भाजीपाला व्यावसायिक व्यवसाय करीत असल्याने परिसरातील नागरिकांना ये-जा करतानाही त्रास होत असल्यामुळे सदरचा भाजीबाजार हटविण्यात यावा, याबाबत परिसरातील नागरिकांची नुकतीच बैठक झाली असून, याबाबत मनपा आयुक्तांची भेट घेणार असल्याचे नगरसेवक माणिक सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
सिडकोतील माणिकनगर, उपेंद्रनगर व महाजननगर भागातील नागरिकांच्या प्रवेशद्वारावरच मनपाच्या भूखंडावर अनधिकृत भाजीबाजार भरत आहे. या भाजीबाजारामुळे येथील रहिवाशांची सोय होण्याऐवजी गैरसोयच अधिक होत असल्याचे नगरसेवक माणिक सोनवणे यांनी सांगितले. या भाजीबाजारातील काही व्यावसायिक हे मुख्य रस्त्यावरच आपला व्यवसाय करीत असल्याने व भाजीपाला घेण्यासाठी येणारे नागरिकही त्यांची वाहने रस्त्यातच लावत असल्याने परिसरातील नागरिकांना या ठिकाणाहून ये-जा करणे कठीण होत आहे.
यातच भाजीबाजारातील उरलेला व खराब भाजीपाला हे व्यावसायिक तेथेच टाकून देत असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घाण व कचरा पडलेला असतो. यामुळे पारिसरातील नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. मनपाच्या याच भूखंडावरून महावितरण कंपनीची उच्च दाबाची तार गेलेली आहे. यातच येथील काही तथाकथित भाजी व्यावसायिकांच्या दबंगगिरीलाही येथील रहिवासी त्रस्त झाले आहेत.
भाजीबाजार हटविण्यात यावा यासाठी परिसरातील नागरिक एकवटले असून, याबाबत झालेल्या बैठकीप्रसंगी प्रभाकर सोनवने, प्रेमनाथ ब्राह्मणकर, हरिश्चंद्र जगताप, रामनाथ मालुंजकर, दत्तू अहिरे, रवींद्र मोरे, धनंजय बागुल, चंद्रकांत अमृतकर, केवळ खैरणार आदिंसह परिसरातील नागरिक उपस्थित होते. (वार्ताहर)