पाडळी फाट्यावर रस्त्यावर भाजीबाजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:14 AM2021-09-18T04:14:57+5:302021-09-18T04:14:57+5:30
ठाणगाव: तालुक्यातील ठाणगाव जवळील पाडळी फाट्यावर रस्त्यावर भरणाऱ्या भाजीपाल्याच्या बाजारामुळे रस्त्यावरुन जाणाऱ्या वाहतुकीस अडथळा होत असून खाजगी वाहनासह सरकारी ...
ठाणगाव: तालुक्यातील ठाणगाव जवळील पाडळी फाट्यावर रस्त्यावर भरणाऱ्या भाजीपाल्याच्या बाजारामुळे रस्त्यावरुन जाणाऱ्या वाहतुकीस अडथळा होत असून खाजगी वाहनासह सरकारी वाहनांना देखील तासन तास वाहतूक मोकळी होण्याची वाट पाहावी लागत आहे. पाडळी फाट्यावर भाजीपाल्याचा मोठ्या प्रमाणावर बाजार भरतो. या ठिकाणी अहमदाबाद , मुंबई, नाशिक , वापी येथील व्यापारी वाटाणा, फरसवाल घेण्यासाठी येत असतात. या ठिकाणी परिसरातील ठाणगाव, आडवाडी, टेंभूरवाडी, हिवरे, पिंपळे, डुबेरे, पाटोळे, मनेगाव, आटकवडे, सोनारी, सोनांबे, कोनांबे, शिवडा, पांढुर्ली , हरसुले, घोरवड आदी भागातून शेतकरी आपल्या वाहनांमधून भाजीपाला विक्रीसाठी पाडळी फाट्यावर घेऊन येत असतात. त्याठिकाणी मालाची विक्री झाल्यानंतर व्यापाऱ्यांकडून पैसे घेण्यासाठी शेतकरी आपल्या वाहनासह रस्त्यावरच उभे असतात त्यामुळे सिन्नरवरुन ठाणगावला जाणाऱ्या सर्वच वाहनांना या ठिकाणी एक - दोन तास वाहतूक मोकळी होण्यासाठी प्रतीक्षा करावी लागते. या ठिकाणी दोन पोलिसांची नियुक्ती करण्यात आलेली आहे पण, पोलीस वाहतूक मोकळी करुन थोडे बाजूला जाताच परत रस्त्यावर गर्दी होत असते.
------------------------
बाजार हलविण्याची मागणी
काही दिवसांपूर्वी या ठिकाणी होणाऱ्या गर्दीमुळे हा भाजीपाला बाजार दुसऱ्या खाजगी मालकीच्या जागेत हलविण्यात आला होता, पण शेतकरी व व्यापारी यांनी खाजगी जागेत जाण्यास सहमती दर्शवली नसल्याने पुन्हा पाडळी फाट्यावरील रस्त्यावरच (त्रिफुलीवर ) भाजीपाला बाजार सुरु झाला आहे. त्यामुळे या ठिकाणी होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे रस्त्याने जाणाऱ्या चाकरमान्यांसह सरकारी वाहनांना देखील अनेक तास त्या ठिकाणी थांबावे लागत आहे . वाहतूक मोकळी करण्यासाठी आणखी पोलीस बंदोबस्त वाढवावा किंवा या ठिकाणी भरणारा भाजीपाला बाजार दुसऱ्या ठिकाणी हलविण्यात यावा अशी मागणी या ठिकाणावरुन जाणाऱ्या सहकारी व खाजगी वाहनधारकांनी केली आहे .
---------------------
सिन्नर तालुक्यातील ठाणगाव जवळील पाडळी फाट्यावर भरणाऱ्या भाजीपाला बाजारामुळे वाहनांची झालेली गर्दी. (१६ पाडळी)
160921\005316nsk_9_16092021_13.jpg
१६ पाडळी