टोमॅटोने गाठली शंभरी! स्पर्धा थेट पेट्रोलच्या दराशी; महाग होण्यामागे 'हे' आहे कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2022 03:49 PM2022-05-28T15:49:53+5:302022-05-28T15:56:42+5:30
मागील वर्षी टोमॅटोला कवडीमोल भाव मिळाल्याने, शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. भाव कमी मिळत असल्याने, शेतकरी बांधवानी यंदा ...
मागील वर्षी टोमॅटोला कवडीमोल भाव मिळाल्याने, शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. भाव कमी मिळत असल्याने, शेतकरी बांधवानी यंदा टोमॅटोची लागवड कमी प्रमाणात केली आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात बाजारात आवक कमी होऊन, टोमॅटोचे भाव ८० ते १०० रूपयांच्या घरात पोहचले आहे. पेट्रोल-डिझेलप्रमाणे टोमॅटोचे दर वाढल्याने, सर्व सामान्यांच्या स्वयंपाक घरातून टोमॅटो हद्दपार झाला आहे.
टोमॅटो शंभरी जवळ
आवक कमी असल्यामुळे टोमॅट्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात चांगला माल किमान ८० त ९० रुपये किलोपर्यंत विकला जात आहे. यामुळे सर्वसामान्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.
म्हणून झाली दरवाढ
दक्षिण भारतात टोमॅटो पिकाचे नुकसान झालेले असल्यामुळे अनेक व्यापारी या भागातून माल खरेदी करून तिकडे पाठवत आहेत. शिवाय यावर्षी शेतकऱ्यांनी मागील अनुभव लक्षात घेऊन लागवड कमी केल्याने हा परिणाम झाला आहे.
पालेभाज्या महागच
उष्णतेमुळे भाजीपाला उत्पादनावर परिणाम झाला आहे. अनेक शेतकऱ्यांना पाण्याअभावी पीक घेता आलेले नाही. यामुळे पालेभाज्यांची आवक कमी झाल्याने मेथी, कांदापात, शेपू, पालक, कोथिंबीर या पालेभाज्यांच्या दरात वाढ झाली असून मेथी ४० रुपये तर, कोथिंबीर ५० ते ६० रुपये जुडी विकली जात आहे.
कांदा मात्र स्वस्त
यावर्षी कांद्याला चांगला दर मिळेल या अपेक्षेने अनेक शेतकऱ्यांनी कांद्याची लागवड केली आहे. सध्या बाजार समित्यांमध्ये मोठी आवक होत असल्याने कांद्याचे दर पडले असून ठाेक बाजारात सरासरी ७०० रुपये क्विंटल इतका दर शेतकऱ्यांना मिळत आहे. यामुळे किरकोळ बाजारातही कांदा स्वस्त झाला आहे.
पेट्रोल-डिझेल स्वस्त पण भाजीपाला महाग
केंद्र शासनाने पेट्रोलवरील उत्पादन शुल्क कमी केल्याने पेट्रोल-डिझेलचे दर थोड्या फार प्रमाणात कमी झाले असून, पेट्रोल १११ रुपये लिटरपर्यंत आले आहे. याउलट भाजीपाला मात्र महागाईचा उच्चांक गाठत असल्याचे दिसते.
वाढत्या उष्म्यामुळे बाजारात भाजीपाल्यांची आवक कमी झाली आहे. विशेषत: पालेभाज्यांना मोठा फटका बसला आहे. यामुळे जागेवरच दर वाढले आहेत. शिवाय मुंबई-पुण्यातही मागणी चांगली असल्याने भाजीपाल्याचे दर वाढले आहेत.
- अनिले पुणे, भाजीपाला विक्रेता