भाजीपाल्याची रोपे फेकली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 12:40 AM2018-04-21T00:40:17+5:302018-04-21T00:40:17+5:30
भाजीपाल्याला योग्य भाव मिळत नसल्याने बहुतेक त्रस्त शेतकऱ्यांनी भाजीपाला लागवड थांबविली आहे. यामुळे परिसरातील भाजीपाला नर्सरीचालकांना तयार भाजीपाल्याची रोपे फेकून द्यावी लागत आहे.
नाशिकरोड : भाजीपाल्याला योग्य भाव मिळत नसल्याने बहुतेक त्रस्त शेतकऱ्यांनी भाजीपाला लागवड थांबविली आहे. यामुळे परिसरातील भाजीपाला नर्सरीचालकांना तयार भाजीपाल्याची रोपे फेकून द्यावी लागत आहे. सध्या बाजारात भाजीपाल्याला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकºयांना आलेल्या खर्चापेक्षा कमी भावात व्यापारी भाजीपाला खरेदी करत आहे. शेतकºयांकडून व्यापारी वर्ग ३० ते ५० पैसे किलोने कोबीची खरेदी करत आहे, तर शेतकयांना भाजीपाला नर्सरीतून ५० ते ६० पैशाला कोबीचे तयार रोप खरेदी करावे लागते. त्या कोबीच्या रोपांची लागवड केल्यानंतर त्यावर होणारा खर्च, कष्ट मोठ्या प्रमाणात होतात. भाजीपाल्याला योग्य भाव शेतकºयांना सध्या मिळत नाही. त्यामुळे बहुतेक शेतकºयांनी सध्या भाजीपाल्याची लागवड करणे थांबविले आहे. त्याचा मोठा परिणाम भाजीपाला नर्सरीवर झाला आहे. नाशिक शहराच्या आजूबाजूच्या ग्रामीण भागातील भाजीपाला नर्सरीमध्ये दरवर्षीच्या अनुभवानुसार कोबी, फ्लॉवर, मिरची, टमाटे, वांगे, कारले, भोपळा आदी भाजीपाल्याच्या रोपांची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र शेतकरी भाजीपाल्याची रोपेच घेत नसल्याने भाजीपाला नर्सरीचालकांना वय झालेली भाजीपाल्याची रोपे ट्रेमधून काढून प्लॅस्टिक गोण्यांमध्ये भरून अक्षरश: फेकून देण्यात येत आहे.
केवळ १० टक्के रोपांची विक्री
सर्वच भाजीपाला नर्सरीमध्ये फक्त १० ते २० टक्के भाजीपाला रोपांची विक्री होत आहे. सर्वच नर्सरीचालकांवर रोपे फेकून देण्याची वेळ आली आहे. पुढील दीड-दोन महिन्यांनंतर भाजीपाल्याचा तुटवडा जाणवण्याची व त्यामुळे भाव वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
नर्सरीचालकांचे आर्थिक नुकसान
जवळपास सर्वच नर्सरीचालकांनी अनुभव व अंदाजानुसार भाजीपाला रोपांची लागवड केली होती. मात्र गेल्या चार महिन्यांत झालेल्या खर्चापेक्षा कमी भाव शेतकºयांना मिळाल्याने सध्या शेतकºयांनी भाजीपाला लागवडीत आखडता हात घेतला आहे. त्यामुळे वय झालेली तयार भाजीपाला रोपे फेकून देण्याची वेळ आल्याने नर्सरीचालकांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.
- हिरामण दशरथ आडके, श्रीमंत नर्सरी, नानेगाव