भाजीपाला व्यापाऱ्यावर शस्त्राने वार करून रोकड पळविली, पेठरोडवरील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2017 12:08 AM2017-12-31T00:08:44+5:302017-12-31T00:09:08+5:30
नाशिक कृषी उत्पन्न बाजारसमितीतून कामकाज आटोपून घराकडे पायी जाणाऱ्या व्यापाऱ्याला रस्त्यात गाठून डोळयात मिरचीची पूड फेकून तसेच हातातील धारदार शस्त्राने कमरेवर वार करून चौघा संशयितांनी दोन लाख रुपयांची रोकड पळवून नेल्याची घटना शनिवार (दि.30) रात्री 11 वाजता पेठरोडवरील भक्तिधाम परिसरात घडली आहे.
नाशिक - नाशिक कृषी उत्पन्न बाजारसमितीतून कामकाज आटोपून घराकडे पायी जाणाऱ्या व्यापाऱ्याला रस्त्यात गाठून डोळयात मिरचीची पूड फेकून तसेच हातातील धारदार शस्त्राने कमरेवर वार करून चौघा संशयितांनी दोन लाख रुपयांची रोकड पळवून नेल्याची घटना शनिवार (दि.30) रात्री 11 वाजता पेठरोडवरील भक्तिधाम परिसरात घडली आहे. या घटनेत भाजीपाला व्यापारी महेशकुमार अग्रहरी हे जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी दिंडोरीरोडवरील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
रोकड लुटून नेल्यानंतर संशयितांनी दिंडोरीरोडकडे निळया रंगाच्या मारूती 800 मधून पलायन केले. याबाबत समजलेली माहिती अशी की, नाशिक कृषी उत्पन्न बाजारसमितीतील भाजीपाला व्यापारी अग्रहरी हे पेठरोडवरील भक्तिधाम परिसरात राहतात. बाजारसमितीतील काम आटोपल्यावर अग्रहरी हे जमा झालेली 2 लाख रुपयांची रोकड घेऊन घराकडे पायी जात असतांना शाम हौसिंग सोसायटीजवळ दबा धरून बसलेल्या लुटरुंनी अग्रहरी यांच्या डोक्यात मिरचीची पूड फेकली व त्यानंतर त्यांच्या कमरेवर धारदार शस्त्राने वार करून रोकड असलेली बॅग हिसकावून नेली. लुटमार करणारे संशयित हे निळया रंगाच्या मारूती 800 मध्ये आले होते. रोकड लुटीनंतर संशयितांनी मारूती कारमधून पलायन केले. घटनेचे वृत्त समजताच पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त विजयकुमार चव्हाण, पोलीस निरीक्षक आनंदा वाघ यांच्यासह पंचवटी पोलीस ठाण्याच्या गुन्हा शोध पथकाने घटनास्थळी धाव घेतली होती. व्यापारी अग्रहरी यांच्याकडे दोन लाख रूपयांपेक्षा जास्त रोकड असल्याचे बोलले जात आहे. याबाबत रात्री उशिरा पावेतो पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.