पोलिसांच्या कारवाईने वाहनधारक नाराज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2017 11:47 PM2017-11-06T23:47:13+5:302017-11-07T00:20:57+5:30
नाशिकरोड पोलीस ठाण्यालगतच वाहतूक शाखेचे पोलीस अक्षरश: रस्त्यात आडवे होऊन विना हेल्मेटधारी दुचाकीचालकांवर सोमवारी दुपारी कारवाई करत होते. मात्र ही हेल्मेट तपासणी मोहीम की सक्तीची दंड वसुली, असा सवाल वाहनधारकांकडून उपस्थित केला जात होता.
नाशिकरोड : नाशिकरोड पोलीस ठाण्यालगतच वाहतूक शाखेचे पोलीस अक्षरश: रस्त्यात आडवे होऊन विना हेल्मेटधारी दुचाकीचालकांवर सोमवारी दुपारी कारवाई करत होते. मात्र ही हेल्मेट तपासणी मोहीम की सक्तीची दंड वसुली, असा सवाल वाहनधारकांकडून उपस्थित केला जात होता. नाशिकरोड पोलीस ठाणे, डीजीपीनगर सिग्नल याठिकाणी अक्षरश: १०-१२ वाहतूक पोलीस रस्त्यात आडवे होऊन दुचाकीचालकांना अडवित असल्याने अपघात होण्याची भीती व्यक्त केली गेली. नाशिकरोड पोलीस ठाण्याजवळ वाहतूक पोलिसांची कारवाई बघून काही वाहनचालक त्या अगोदरच अचानक रस्त्यात थांबून पुन्हा माघारी चुकीच्या दिशेने जात होते. यामुळेसुद्धा अपघात होण्याची शक्यता दिसत होती. वाहतूक पोलिसांनी हेल्मेट सक्ती करण्यासोबत बिटको चौक, शिवाजी पुतळा, आंबेडकर पुतळा चौक येथे वाहतुकीला अडथळा ठरणाºयांवर कारवाई करून वाहतुकीसाठी चौक खुला करावा, तसेच बिटको चौकाच्या बाजूच्या रस्त्यावर, गायकवाड मळा, मुक्तिधाम-सोमाणी उद्यान रोड, वास्को चौक, मस्जिद रोड, जयराम हॉस्पिटल रोड येथे रस्त्यावर वाहतुकीला अडथळा ठरणाºया वाहनांवर कारवाई करणे गरजेचे आहे. एकाच ठिकाणी हेल्मेट सक्तीकरिता १०-१२ वाहतूक पोलीस तैनात करण्यापेक्षा रहदारीच्या चौकात वाहतूक पोलिसांची नियुक्ती केली तर वाहतुकीचा खोळंबा कमी होईल, असे नागरिकांचे म्हणणे होते.
वाहतुकीचा बोजवारा; पोलिसांचा काणाडोळा
नाशिकरोड परिसरात विस्कळीत वाहतूक आणि बेशिस्त वाहनचालक ही मोठी समस्या आहे. या ठिकाणी वाहतूक पोलीस बिटको चौकात उभे असतात मात्र वाहतूक कोंडी फोडण्यासाठी कोणतेही प्रयत्न होताना दिसत नाहीत. संपूर्ण नाशिकरोड परिसरातील रस्ते वाहतूक कोंडीने व्यापले असताना व वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करणे अपेक्षित असताना हेल्मेट तपासणी मोहीम राबवून केवळ दंड वसुलीवरच पोलीस लक्ष केंद्रित करीत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.