ग्रामीण भागातील वाहनधारक पेट्रोल दरवाढीने हवालदिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 08:40 PM2021-06-02T20:40:57+5:302021-06-03T00:09:53+5:30
देवगांव : त्र्यंबकेश्वर तालुका आदिवासी ग्रामीण तसेच अतिदुर्गम भागात बेरोजगारी सारख्या प्राथमिक समस्या असतांना पेट्रोलच्या प्रति लिटर दराने शंभरी पार केल्याने आदिवासी ग्रामीण भागातील जनतेच्या जीवनावर परिणाम झाला आहे.
देवगांव : त्र्यंबकेश्वर तालुका आदिवासी ग्रामीण तसेच अतिदुर्गम भागात बेरोजगारी सारख्या प्राथमिक समस्या असतांना पेट्रोलच्या प्रति लिटर दराने शंभरी पार केल्याने आदिवासी ग्रामीण भागातील जनतेच्या जीवनावर परिणाम झाला आहे.
कोरोना संसर्गाच्या फैलावावर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य सरकारने लागू केलेल्या निर्बंधांमुळे उद्योगधंदे बंद पडले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात बेरोजगारी वाढली आहे. त्यातच पेट्रोलच्या दराने शंभरी पार केल्याने देवगांव परिसरातील दुचाकीधारक तसेच पेट्रोलवर चालणाऱ्या वाहने आणि ग्रामीण भागातील जनता मेटाकुटीस आले आहेत.
राज्य शासनाच्या ' ब्रेक दी चेन' साठी इगतपुरी आगारातील फेऱ्या देखील कमी करण्यात आल्या असून प्रवास करताना उभ्याने प्रवास करणे बंदी असल्याने ग्रामीण भागातून कोणत्याही भागात ये जा करण्यासाठी दुचाकी शिवाय पर्याय शिल्लक राहिला नाही. अशातच पेट्रोलचा खर्च परवडत नसल्याने एका दुचाकीवर तीन व्यक्ती ये जा करत असतात.
मात्र, पेट्रोलने शंभरी गाठल्यामुळे अडचणीत भर पडली आहे. स्वयंपाकाचा गॅस, खाद्यतेल, डाळी आणि भाज्या प्रचंड प्रमाणात आधीच महागल्याने नागरिक आधीच त्रस्त असताना आता पेट्रोलचे दर वाढल्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. कोरोनाच्या संकटामुळे हैराण झालेल्या जनतेला महागाईच्या झळा सोसवेना झाल्या आहेत.
पेट्रोलच्या किंमतीने शंभरी पार केल्याने खिशाला मोठी झळ बसत आहे. कोरोनाच्या निर्बंधांमुळे बससेवा बंद असल्यामुळे किराणा, दवाखाना, शेतीची कामे, बँक कामे आदींसाठी दुचाकीशिवाय पर्यायच नाही.
- लक्ष्मण देहाडे, दुचाकीधारक. (०२ देवगाव)