वाहनचोरी, घरफोड्या करणाऱ्या दोन सराईतांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2018 06:23 PM2018-11-24T18:23:50+5:302018-11-24T18:25:14+5:30
सिन्नर : नाशिक स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अहमदनगर जिल्ह्यातील राहता तालुक्याच्या परिसरात सापळा रचून मोटार वाहनांची चोरी करणारे तसेच घरफोड्या करणाºया परजिल्ह्यातील दोन सराईत संशयितांना जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून पिकअप गाडीसह १ लाख ७९ हजार रूपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.
सिन्नर : नाशिक स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अहमदनगर जिल्ह्यातील राहता तालुक्याच्या परिसरात सापळा रचून मोटार वाहनांची चोरी करणारे तसेच घरफोड्या करणाºया परजिल्ह्यातील दोन सराईत संशयितांना जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून पिकअप गाडीसह १ लाख ७९ हजार रूपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.
३१ आॅक्टोबर २०१८ च्या मध्यरात्रीच्या सुमारास सिन्नर तालुक्यातील सोमठाणे येथील शेतकरी संभाजी परशराम धोक्रट यांची पिकअप गाडी क्र (एमएच ४३ एफ ५४३२) ही अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली होती. याबाबत सिन्नर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक संजय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील गुन्ह्यांचा आढावा घेवून गुन्हे उघडकीस करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक अशोक कर्पे यांच्या पथकाने सदर गुन्ह्याचा तपास सुरू केला होता. सदर गुन्ह्याचे आरोपी हे जिल्ह्याच्या सिमावरती भागामध्ये असल्याचे स्थानिक गुन्हे शाखेला खबºयामार्फत माहिती मिळाली होती. पथकाने अहमदनगर जिल्ह्यातील राहता तालुक्याच्या गणेशनगर साखर कारखाना परिसरात सापळा लावण्यात आला होता. सापळयात संशयीत आरोपी आनंद अनिल काळे (२३) व गणेश भिकन तेलोरे (१९) दोघेही राहणार गणेशनगर ता. राहता जि. अहमदनगर यांना ताब्यात घेतले. वरील गुन्ह्यात चोरीस गेलेली सफेद रंगाची पिकअप गाडी हस्तगत करण्यात आली. संशयीतांकडे अधिक चौकशी केली असता त्यांचे साथीदार राहुल अनिल काळे, शुभम अनिल काळे, भरत काळे, राहुल वाघमारे यांच्यासह सदरचा गुन्हा केल्याची त्यांनी कबुली दिली. त्यांच्या घराची झडती घेतली असता चोरून आणलेले रेडीमेड कपडे व किरणा माल मिळून आला. औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण एमआयडीसी येथील कपड्याचे दुकान तर श्रीरामपूर शहर परिसरात किराणा दुकानात चोरी केली असल्याची कबुली संशयित आरोपींनी दिली. संशयितांकडून पिकअप गाडीसह रेडीमेड कपडे व किरणा माल असा एकुन १ लाख ७९ हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक कर्पे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राम कर्पे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अरूण पगारे, पोलीस हवालदार संजय गोसावी, सुशांत मरकड, मंगेश गोसावी, कुणाल मोरे, विशाल आव्हाड, हेमंत गिलबिले, प्रदिप बहिरम, संदीप लगड पथकात सहभागी होते.