वणी बाजारात वाहनांना रिफ्लेक्टर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2018 12:22 AM2018-03-01T00:22:20+5:302018-03-01T00:22:20+5:30
वाहन इतक्या वेगात चालवू नये की आपला ताबा त्यावरून सुटून अपघात होईल. वाहन चालवताना हुल्लडबाजी करू नये. कोणतीही नशा करून वाहन चालवू नका. नियमांचे पालन करूनच वाहन चालवा. प्रत्येकाला आपला जीव प्रीय आहे, याचे भान प्रत्येकाने ठेवल्यास निश्चितच अपघातांची संख्या कमी होईल, असे प्रतिपादन प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांनी केले.
वणी : वाहन इतक्या वेगात चालवू नये की आपला ताबा त्यावरून सुटून अपघात होईल. वाहन चालवताना हुल्लडबाजी करू नये. कोणतीही नशा करून वाहन चालवू नका. नियमांचे पालन करूनच वाहन चालवा. प्रत्येकाला आपला जीव प्रीय आहे, याचे भान प्रत्येकाने ठेवल्यास निश्चितच अपघातांची संख्या कमी होईल, असे प्रतिपादन प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांनी केले. वणी येथे उपबाजार आवारात ‘रिफ्लेक्टर लावा’ या अभियानाप्रसंगी ते बोलत होते. दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती व प्रादेशिक परिवहन कार्यालय नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या या कार्यक्रमासाठी सभापती दत्तात्रय पाटील, जिल्हा बँकेचे संचालक गणपतराव पाटील, राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक माणिकराव सोनवणे, तुकाराम कर्डिले, भास्कर भगरे, डॉ. योगेश गोसावी, उपसरपंच विलास कड, मधुकर भरसट, मुन्ना मणियार, संजय उंबरे, नंदलाल चोपडा प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित होते. यावेळी दत्तात्रय पाटील, गणपतराव पाटील, माणिकराव सोनवणे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. बाजार समितीत माल घेऊन येणाºया ट्रॅक्टर ट्रॉलीला रिफ्लेक्टर नसल्याने अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. अपघात टाळण्यासाठी ‘रिफ्लेक्टर लावा’ उपक्रम स्तुत्य असून, विना परवाना वाहन चालविणे हे धोक्याचे आहे. प्रत्येक कुटुंब हे आपले कुटुंब आहे अशी भावना ठेऊन काळजी घेतल्यास अपघात टळण्यास मदत होईल, असेही मत पाटील यांनी व्यक्त केले. यावेळी प्रादेशिक परिवहन विभागाचे हेमंत हेमाडे, प्रज्ञा अभंग, प्रशांत थोरात, राहुल कदम, पोलीस उपनिरीक्षक नितीन पाटील, बाजार समिती उपसभापती अनिल देशमुख, संचालक व वाहनधारक उपस्थित होते.