घोटी-सिन्नर मार्गावर वाहनचालकाची लूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 04:09 PM2018-09-17T16:09:54+5:302018-09-17T16:10:06+5:30
लुटारू फरार : डोळ्यात मिरची स्प्रे मारत अडीच लाख लंपास
घोटी : शिर्डीहून मुंबईला जाणाऱ्या दाम्पत्याला डोळ्यात मिरचीचा स्प्रे मारून लुटल्याची घटना रविवारी (दि.१६) मध्यरात्री घोटी-सिन्नर मार्गावर घडली.दरम्यान या घटनेची माहिती मिळताच घोटी पोलिसांनी रात्रभर तपास मोहीम राबविली मात्र आरोपी हाती लागले नाहीत. याबाबत घोटी पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, ठाणे येथील सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी संजीत तुकाराम शेवाळे हे रविवारी रात्रीच्या सुमारास आपल्या पत्नीसह शिर्डीवरून दर्शन करून मुंबईला आपल्या (स्कोडा क्र मांक एम.एच.०४ जे.पी. ८०४५) वाहनाने मुंबईला परतत असताना देवळे शिवारातील ज्योती कारखान्याजवळ मागून येणा-या विनाक्र मांकाच्या सिल्वर रंगाच्या स्विफ्ट डिझायर वाहनाने स्कोडा वाहनाला आडवी लावून अडविले. डिझायर वाहनातून दोघा अनोळखी लुटारूंनी उतरून स्कोडा वाहनातील संजीत शेवाळे यांच्या डोळ्यात मीरचीचा स्प्रे मारून गाडीच्या मागच्या सीटवर ठेवलेली अडीच लाख रु पये असलेली पैशाची बॅग आणि जमिनीचे कागदपत्र घेऊन फरार झाले. दरम्यान हा प्रकार घडत असल्याचे अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष लकी जाधव यांच्या निदर्शनाला आले. त्यांनी लुटारूच्या वाहनाला आपले वाहन आडवे लावले मात्र लुटारूनी लकी जाधव यांच्या वाहनालाही धडक देत पोबारा केला.
या घटनेची माहिती नजीकच्या पेट्रोलपंप चालकाने घोटी पोलिसांना कळविली. घोटी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज भालेराव, चालक नितीन भालेराव व पथकाने अवघ्या काही मिनिटात घटनास्थळी धाव घेतली.सदरचे लुटारू घोटी शहरातून कांचनगाव मार्गे गेले असल्याने पोलिसांनी पाठलाग केला .मात्र ते हाती लागू शकले नाहीत. दरम्यान पोलिसांनी नाकाबंदी करून रात्रभर तपास मोहीम राबविली. घटनेची माहीती समजताच पेठचे उपअधीक्षक सचिन गोरे,अतुल झेंडे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन तपासाच्या सूचना दिल्या. याबाबत घोटी पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आंनद माळी करीत आहे.
दरोड्याबाबत साशंकता
घोटी सिन्नर मार्गावर झालेल्या या प्रकारामुळे खळबळ उडाली असून,यातील संजीव शेवाळे हे पोलीस कर्मचारी आहेत. त्यांनी शिर्डीवरून परतताना सिन्नर येथून एटीएम मधून अठरा हजार रु पये काढले असल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे.जर एटीएम असताना गाडीत अडीच लाख रु पये का ठेवले?असा प्रश्न पोलीसांनी उपस्थित केला आहे. विशेष म्हणजे शेवाळे हे पोलीस खात्यात असताना वादग्रस्त असल्याने त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली असून जमीन व्यवहारात त्यांच्यावर स्थानिक पातळीवर चौकशी चालू आल्याचे चौकशीत निष्पन्न झाले असल्याने हा दरोडा की बनाव याबाबत पोलीस तपास करीत आहे. मात्र चार दिवसात दोन रस्त्यावर दरोड्याचे प्रकार घडल्याने वाहनधारकांत घबराट पसरली आहे.