Coronavirus: आता दुचाकीसाठी १००, तर चारचाकीसाठी १००० रुपयांचंच इंधन मिळणार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2020 03:37 PM2020-03-23T15:37:57+5:302020-03-23T15:38:28+5:30
coronavirus अनेक जण वाहनं घेऊन रस्त्यावर येत असल्यानं जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय
नाशिक: कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनता कर्फ्यू पाळण्याचं आवाहन केलं होतं. पंतप्रधानांच्या आवाहनाला देशभरातील जनतेनं उत्स्फूर्त प्रतिसादही दिला. मात्र काल जनता कर्फ्यू पाळल्यानंतर आज देशभरातल्या रस्त्यांवर पुन्हा वर्दळ दिसू लागली. रस्ते, बसेस बंद करण्यात आल्यानं अनेकजण खासगी वाहनं घेऊन रस्त्यावर आले. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती वाढू लागलीय. या पार्श्वभूमीवर नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांनी महत्त्वाचा निर्णय घेतलाय.
नागरिकांनी घराबाहेर पडणं टाळावं, असं आवाहन वारंवार सरकार आणि प्रशासनाकडून केलं जातंय. मात्र तरीही अनेक जण घराबाहेर पडत आहेत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद असल्यानं खासगी वाहनं घेऊन रस्त्यावर उतरणाऱ्यांची संख्या अतिशय मोठी आहे. त्यामुळे आता दुचाकी आणि चारचाकी वाहनांना मर्यादित इंधन देण्याचा निर्णय नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी घेतला. त्यामुळे आता दुचाकीस्वारांना १०० रुपयांचं पेट्रोल मिळेल. तर चारचाकी वाहनांना जास्तीत जास्त एक हजार रुपयांचं इंधन देण्यात येईल.
नागरिकांनी घराबाहेर पडू नये आणि कोरोनाचा संसर्ग वाढू नये या हेतूनं नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांनी इंधन पुरवठ्यावर निर्बंध आणले आहेत. आज सकाळपासून रस्त्यावरील वाहतूक वाढल्यानं जिल्हाधिकारी मांढरे यांनी महत्त्वाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आता वाहन चालकांना मर्यादित इंधन मिळेल. काही जण वेगवेगळ्या पेट्रोल, डिझेल पंपांवर जाऊन निर्णयाचं उल्लंघन करू शकतात. अशा व्यक्तींवर नजर ठेवण्यासाठी डिजिटल यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे. या यंत्रणेच्या माध्यमातून नियम मोडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात कलम १८८ आणि १४४ अंतर्गत कारवाई करण्यात येईल. अशा व्यक्तींना सहा महिन्यांचा तुरुंगवास होऊ शकतो.