वाळू वाहतूक करणारी वाहने जप्त १५ जानेवारीपासून धडक कारवाईची मोहीम हाती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2018 12:28 AM2018-02-05T00:28:26+5:302018-02-05T00:28:54+5:30
लासलगाव : महसूल वसुलीकरिता १५ जानेवारीपासून धडक कारवाईची मोहीम हाती घेतल्याने अवैध वाळू वाहतूक करणाºयांचे धाबे दणाणले आहे.
लासलगाव : जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. आणि निफाडचे नवनियुक्त तहसीलदार शिवकुमार आवळकंठे यांनी विविध महसूल वसुलीकरिता १५ जानेवारीपासून धडक कारवाईची मोहीम हाती घेतल्याने अवैध वाळू वाहतूक करणाºयांचे धाबे दणाणले आहेत.
या कारवाईत लहान-मोठी अशी २६ वाहने पोलीस ठाण्यात उभी असून, यातून सुमारे ७० लाखांपेक्षा अधिक महसूल शासकीय तिजोरीत भरणा होणार आहे. शासनाच्या विविध महसूल वसुली व उद्दिष्ट पूर्ण न केल्याने जिल्हाधिकारी राधाकृष्णन यांनी निफाडचे तहसीलदार भामरे यांना सक्तीच्या रजेवर पाठविले आहे. तहसीलदार आवळकंठे यांना निफाडचे निवासी नायब तहसीलदारपदाचा अनुभव आहे. त्यामुळे निफाडची भौगोलिकदृष्ट्या त्यांना चांगलीच माहिती आहे. निफाडचा गोदाकाठ तसेच जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील खापरखेडा व धरणाला नांदेड येथून वाळूची अवैध वाहतूक होते यांची माहिती मिळाली. त्यांनी पिंपळगाव ते ओझरदरम्यान स्वत: उभे राहून अवैध वाळू वाहतूक करणारी मोठी वाहने अडवून कारवाई केली. सहनायब तहसीलदार संघमित्रा बाविस्कर यांच्यासह तयार केलेल्या पथकानेसुद्धा वाळूची अवैध वाहतूक करणाºया वाहनांवर कारवाई करत मालेगावचे तहसीलदार यांच्याकडे वाळूसह २८ वाहने जमा केली आहेत. या कारवाईत सुमारे ५६ लाख, तर चांदवड तहसीलदार यांच्याकडे जमा मोठी दहा वाहने अशी एकूण ७६ लाखरुपयांची दंडात्मक महसुली गौणखनिज वसुली होणार आहे. सुमारे दीड कोटीपेक्षा अधिक रक्कम दंड म्हणून शासन तिजोरीत जमा होणार आहे. निफाड तालुक्यात आतापर्यंत केलेल्या कारवाईत लासलगाव पोलीस ठाण्यात ३, सायखेडा ३, ओझर ३, निफाडमध्ये मोठी २ व लहान १५ वाहने गौणखनिजासह जमा आहेत. दरम्यान महसुली कारवाईत हस्तक्षेप करणाºया तीन जणांविरुद्ध निफाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सात वाहनांतील वाळूचा लिलाव करून महसूल जमा करण्याची कारवाई पूर्ण झाली आहे. तसेच तालुक्यातील २५ वाळूसाठे पकडून ७० लाखांची वसुली करण्यात आली आहे. तलाठी व महसूल अधिकाºयांच्या विशेष पथकाकडून धडक कारवाई केली जात आहे. तलाठी यांच्याकडील थकीत वसुलीवर लक्ष दिल्याने दररोज चार ते पाच लाख रुपयांचा भरणा होत आहे. या कारवाईमुळे शासकीय चलन भरून वाहतूक करणाºयांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.
पिंपळगाव बसवंत येथे पथकाने ठोकला तळ
नायब तहसीलदार संघमित्रा बाविस्कर यांच्या पथकाने पिंपळगावी तळ ठोकून येथील विविध इमारती, रु ग्णालये यासह ६५ मिळकतींची तपासणी केली. येथील १८ जणांवर कारवाईचे काम सुरू आहे. यातून साडेचार कोटींचा महसूल भरणा होणार आहे. लासलगाव येथे १४, निफाड ३२, तर ओझरमध्ये ३ ठिकाणी कारवाई करण्यात आली. पिंपळगाव येथे इनाम वर्ग ६ बाबत वाणिज्य प्रयोजन केले म्हणून कारवाई करण्यात आली. कांदाचाळ-ऐवजी शोरूम बांधल्याबाबत, राजीवनगर गृहनिर्माण संस्थेत जागा वापर न केल्याबाबत कारवाई करून कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. निफाड तहसील कार्यालयास मार्चअखेर १६.५० कोटी रूपयांचे महसूल वसुली उद्दिष्ट आहे. गेल्या काही महिन्यांपासून वसुली थंडावली होती. येत्या दोन महिन्यात उद्दिष्टपूर्ती व प्रलंबित कामांचा निपटारा करण्यावर भर देण्यात येणार आहे. नागरिकांनी देय महसूल रक्कम वेळेत भरणा करावी, असे आवाहन तहसीलदार आवळकंठे यांनी केले आहे. निफाडमध्ये जमिनीची माहिती संकलित होत असताना मार्तंडराव होळकर सरंजाम इनाम जमिनीशी संबंधित अनेक प्रकरणे शोधून त्याबाबत कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. लासलगाव येथील रस्त्यालगत असलेल्या सर्व्हे नंबर ९३च्या जमिनीबाबतही नोंद घेण्यात आली. अनेक दुकानदारांनी या शासकीय जागेचा नियमबाह्य वापर गेल्याने त्यांनाही नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. शासकीय जागा ताब्यात असताना त्याचा दुसºया कारणाकरिता उपयोग करणे, जागेचा वापर न करता शर्तीचा भंग करणे यासह सत्ता ‘ब’ प्रकाराबाबत तालुक्यातील महसूल मंडल निरीक्षक व तलाठी यांच्या यंत्रणेचे काम गतिमान केले आहे. या कारवाईत करोडो रुपयांचा महसूल वसूल होणार आहे. वापर न करणारे नागरिक संस्था, व्यापारी गाळ्यांचे बांधकाम अधिकृत आहे का याविषयी माहिती घेण्यासाठी विशेष पथकांची निर्मिती करण्यात आली आहे.