वेळुंजेला विनापरवानगी पुतळा बसवला, गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2021 10:52 PM2021-11-10T22:52:52+5:302021-11-10T22:56:15+5:30
त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील वेळुंजे या गावात दि. २९ ऑक्टोबर रोजी एका महापुरुषाचा पुतळा पहाटे काही गावकऱ्यांनी गावठाणाच्या जागेवर कोणाचीही परवानगी न घेता, अनधिकृतपणे उभारल्याने ग्रामसेवकाने या प्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिसांनी १८ संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वेळुंजे गावात गेल्या २९ ऑक्टोबरला काही गावकऱ्यांनी एका महापुरुषाचा पुतळा विनापरवानगी उभारला. शासनाची पूर्वपरवानगी न घेता, हा पुतळा उभारल्याने ग्रामसेवकाने त्याबाबत गावकऱ्यांची समजूत काढत त्यांना परवानगी घेऊनच पुतळा बसवण्याची विनंती केली, परंतु गावकरी मागे हटायला तयार नव्हते. या प्रकरणामुळे गावात तणावाची स्थिती निर्माण झाली होती. अखेर ग्रामसेवकाने त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. शासनाच्या आदेशाचे उल्लंघन केले व परवानगी न घेता पुतळा उभारला, म्हणून त्र्यंबक पोलीस ठाण्यात १८ संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे यांनी घटना स्थळी येऊन परिस्थितीची पाहणी केली आणि गावात शांतता व सलोखा राखण्याचे आवाहन केले आहे. याबाबतचा अधिक तपास हवालदार गंगावणे करीत आहेत.