उद्घाटनाच्या ठिकाणीच व्हेंडिंग मशीन झाले ‘शोे-पीस’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 01:03 AM2017-11-28T01:03:49+5:302017-11-28T01:06:10+5:30
भाग्यश्री मुळे/ गणेश धुरी
नाशिक : ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते जिल्हा परिषदेच्या शासकीय कन्या विद्यालयात दोन वर्षांपूर्वी आॅगस्ट २०१५ मध्ये गाजावाजा करत उद््घाटन करून बसविलेले व्हेंडिंग मशीन दुसºया दिवसापासूनच शोकेसमध्ये कुलूपबंद आहे. राज्यातील हा पहिला पथदर्शी प्रकल्प उद्घाटनाच्या ठिकाणीच बासनात गुंडाळला गेल्याचे ‘लोकमत’च्या पाहणीत निदर्शनास आले. विशेष म्हणजे सदर मशीनमधून एकही नॅपकिनचे व्हेंडिंग करण्यात आलेले नाही. अशाप्रकारचे मशीन बसवणारी जिल्हा परिषद, शाळा व्यवस्थापन व ज्यांचा महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे ते महाराष्टÑ शासन यापैकी एका घटकानेही याचा अद्याप पाठपुरावा केलेला नाही, हे आणखी विशेष. त्यामुळे हे मशीन म्हणजे एक शो पीस बनले आहे. मशीनचा वापरच झालेला नसल्याने त्याची देखभाल, दुरुस्ती, मशीनमध्ये नॅपकिन्स संपले आहेत का, नव्याने नॅपकिन त्यात भरले जातात का हे प्रश्नच निर्माण होत नाही. प्रकर्षाने जाणवणारी आणखी एक विसंगती म्हणजे हे मशीन शाळेत दुसºया मजल्यावर बसविण्यात आले आहे, तर मुलींचे स्वच्छतागृह तळमजल्यावर शाळेच्या प्रांगणात एका कोपºयात आहे. त्याचा अद्याप वापरच झालेला नसला, तरी तो झाला असता तर विद्यार्थिनींनी वरच्या मजल्यावरून नॅपकिन घेऊन मग तळमजल्यावर जायचे, असा प्रकार करावा लागला असता. तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्ष विजयश्री चुंबळे यांच्या संकल्पनेतून हे मशीन बसविण्यात आले होते.
अलीकडील काळात लहान वयातच मुलींना मासिक पाळी सुरू होते, त्याची अनेक कारणे आहेत. परंतु त्याचबरोबर शाळा, क्लासेसच्या निमित्ताने विद्यार्थिनींना दीर्घकाळ घराबाहेर रहावे लागते. अशावेळी शासन आणि आरोग्य यंत्रणा त्यासाठी सजग होत आहे ही चांगली बाब आहे. परंतु शासकीय यंत्रणेने राबविलेल्या या मोहिमेला आरंभशूरतेपलीकडे काहीच अर्थ नाही, अशा प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
विद्यार्थिनी, शिक्षक, कर्मचारी या घटकांना मशीन बंद का आहे आणि ते कधी सुरू होणार याची कोणतीही माहिती नसल्याचे दिसून आले.
दुसरीकडे शाळा व्यवस्थापनाकडून मात्र मुलींना अचानक मासिक पाळी आल्यास प्रत्येक वर्गशिक्षकेकडून नॅपकिन पुरविण्याची सोय करण्यात आली आहे, असे सांगण्यात आले.
रोल मॉडेल बासनात
ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते जिल्हा परिषदेच्या शासकीय कन्या विद्यालयात दोन वर्षांपूर्वी बसविलेले व्हेंडिंग मशीन दुसºया दिवसापासूनच शोकेसमध्ये कुलूपबंद करून ठेवण्यात आल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. विशेष म्हणजे उद््घाटनाच्या वेळी हा प्रयोग नाशिक पॅटर्नमधून राज्यभर राबविणार असल्याचे त्यावेळी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी जाहीर केले होते. दुर्दैवाने दोन वर्षांपासून पहिलाच रोल मॉडेलमधून राज्यभर जाणारा हा प्रयोेग सुरुवातीलाच आरंभशूर ठरल्याचे चित्र आहे.
जिल्हा परिषदेच्या मालकीच्या जिल्ह्यात दोन शाळा असून, त्यापैकी एक शाळा शहरात शासकीय कन्या शाळेच्या नावाने आहे, तर दुसरी शाळा देवळा येथे देवळा विद्यानिकेतन नावाने आहे. त्यातही केवळ मुलींसाठी म्हणून शासकीय कन्या शाळेचा गौरवाने जिल्ह्यात उल्लेख केला जातो. मात्र गेल्या काही वर्षांपासून ही शंभर वर्षांची परंपरा असलेल्या कन्या शाळेचा साडेसातीचा वनवास मात्र काही केल्या संपता संपत नसल्याचे चित्र आहे. राज्याच्या ग्रामविकासमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या ‘किशोरवयीन व मुलींच्या संपन्न जीवनासाठी’चा हा प्रवास केवळ एका शोकेसमध्ये शोेपीस बनून राहिल्याचे दुर्दैवाने दिसून येते.
विद्यार्थिनींची घटती संख्या ही डोकेदुखी
जवळपास शंभर वर्षांची परंपरा असलेल्या जिल्हा परिषदेच्या शासकीय कन्या शाळेतील विद्यार्थिनींची घटती संख्या ही जिल्हा परिषदेसाठी एक डोकेदुखी ठरली आहे. ब्रिटिशकालीन इमारत असलेल्या शासकीय कन्या शाळेची साडेसाती गेल्या काही वर्षांपासून सुरू झाली आहे. सुरुवातीला ही शाळा म्हणजे बदली केंद्र बनले होते.
जिल्हा परिषदेच्या सर्व कर्मचाºयांच्या बदल्या याच इमारतीत व्हायच्या. नंतर या गोेंधळामुळे विद्यार्थिनींचे नुकसान होत असल्याचे आरोप झाल्यानंतर या बदल्यांची कार्यवाही थांबविण्यात आली.
पाच वर्षांपूर्वी इमारतीला तडे गेल्याने ही इमारत पाडून नवीन इमारत बांधण्याची मागणी केली गेली. मात्र इमारत प्राचीन वस्तू असल्याने ती न पाडताच तिची डागडुजी करण्यावर जिल्हा परिषदेने तब्बल दीड कोटींचा निधी खर्च केला. इमारतीची डागडुजी व रंगरंगोटी करण्यात आली. तरीही विद्यार्थिनींची घटती संख्या ही जिल्हा परिषदेसाठी एक डोकेदुखी ठरली आहे.