जेलरोडला विक्रेत्यांनी उरलेला भाजीपाला फेकला रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2020 09:00 PM2020-08-20T21:00:05+5:302020-08-21T00:39:39+5:30
जेलरोड, जुना सायखेडा रोड, नारायण बापू चौक रस्त्यावर बसणारे भाजीविक्रेते दररोज सायंकाळी आपला उरलेला भाजीपाला रस्त्याच्या कडेला फेकून देत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. फेकलेल्या भाजीपाल्यावर पावसाचे पाणी साचून परिसरात रोगराई पसरण्याची दाट शक्यता आहे.
नाशिकरोड : जेलरोड, जुना सायखेडा रोड, नारायण बापू चौक रस्त्यावर बसणारे भाजीविक्रेते दररोज सायंकाळी आपला उरलेला भाजीपाला रस्त्याच्या कडेला फेकून देत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. फेकलेल्या भाजीपाल्यावर पावसाचे पाणी साचून परिसरात रोगराई पसरण्याची दाट शक्यता आहे. मनपा प्रशासनाने भाजी विक्रेत्यांना योग्य ती समज द्यावी अशी मागणी परिसरातील रहिवाशांनी केली आहे.
जुना सायखेडारोड अभिनव हायस्कूल परिसरामध्ये रस्त्याच्या दुतर्फा अनाधिकृत भाजीबाजार भरत आहे. परिसरातील लोकसंख्या व त्या ठिकाणी मनपा प्रशासनाकडून भाजी बाजाराचे नियोजन न करण्यात आल्याने रस्त्यावर भाजी विक्रेते बसतात. रहिवासी देखील मोठ्या संख्येने भाजीपाला घेण्यास येत असल्याने दिवसेंदिवस भाजीविक्रेत्यांची संख्या वाढत आहे. मात्र काही भाजी विक्रेते सायंकाळनंतर आपला उरलेला भाजीपाला हा रस्त्याच्या कडेला फेकून देत असल्याने परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य वाढु लागले आहे.
विक्रेत्यांना समज देण्याची मागणी
सध्या पावसाळा सुरु असून फेकलेल्या भाजीपाल्यावर पावसाचे पाणी पडत असल्याने तो कुजून त्याची दुर्गंधी अजून वाढत आहे. त्यामुळे परिसरात रोगराई पसरण्याची दाट शक्यता आहे. फेकलेला भाजीपाला खाण्यासाठी मोकाट जनावरे या भागात सतत वावरत असतात. त्यामुळे परिसरातील रहिवासी त्रस्त झाले आहेत. मनपा प्रशासन व लोकप्रतिनिधींनी भाजीपाला विक्रेत्यांना योग्य ती समज द्यावी अशी मागणी परिसरातील रहिवाशांकडून केली जात आहे.