उपक्रमशील : मानवनिर्मित प्रवास साधनांचा घेतला प्रत्यक्ष अनुभव वाघेरा येथील विद्यार्थ्यांची हवाईसफर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2018 12:15 AM2018-02-11T00:15:04+5:302018-02-11T00:18:27+5:30
पेठ : सहल म्हटले की, शालेय मुलांसाठी अत्यानंदाचा क्षण. मग साधी परिसर सहल, वनभोजन, क्षेत्रभेट असो, की महामंडळाच्या लालपरीतून देवदर्शन.
पेठ : सहल म्हटले की, शालेय मुलांसाठी अत्यानंदाचा क्षण. मग साधी परिसर सहल, वनभोजन, क्षेत्रभेट असो, की महामंडळाच्या लालपरीतून देवदर्शन. त्यात एखादी सहल जर थेट अवकाशातून झेप घेणारी असेल तर मुलांचा आनंद काही विरळाच. असाच एक सुखद अनुभव वाघेरा येथील निवासी आश्रमशाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांनी औरंगाबाद ते मुंबई विमानप्रवास करत मुंबईदर्शन करून घेतला.
महाराष्ट्र समाज सेवा संघ, नाशिक संचलित विठ्ठलराव पटवर्धन उत्कर्ष आश्रमशाळा, वाघेरा येथील इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी औरंगाबाद ते मुंबई अशी विमानाने हवाई सफर केली. राज्याच्या इतिहासात प्रथमच आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी विमानाने सहलीचा अनुभव घेतला. या सहलीची वैशिष्ट्ये म्हणजे रस्ते, लोहमार्ग, जल व हवाईमार्ग या सर्व साधनांचा अनुभव घेणे हे होते. येथील उपक्रमशील वर्गशिक्षक राजेश भोये, मुख्याध्यापक संदीप चौधरी यांनी या सहलीचे आयोजन केले होते. यात वाघेरा ते नाशिक बसने, नाशिक ते औरंगाबाद रेल्वेने, औरंगाबाद ते मुंबई विमानाने, मुंबईत समुद्र बोटीने असा नियोजन केल्याप्रमाणे विद्यार्थ्यांनी प्रवास अनुभवला. वाघेरा आश्रमशाळा विद्यार्थ्यांना अनेकविध शैक्षणिक अनुभव देण्यासाठी नेहमीच पुढाकार घेते. त्याचदृष्टीने या सहलीचेही आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांसोबत वर्गशिक्षक राजेश भोये, मुख्याध्यापक संदीप चौधरी, शिक्षक रंजना तायडे, रंजना खंबाईत, अधीक्षिका संगीता मालुंजकर होते. सहलीदरम्यान दोन दिवस विद्यार्थ्यांचा भोजन खर्च शिवाजी नागरे व शांताराम मानभाव यांनी सामाजिक जाणीव ठेवत स्वखर्चाने केला. सहलीदरम्यान विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीही विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
शाळेच्या या आगळ्या-वेगळ्या सहलीबद्दल संस्थाप्रमुख चंद्रकांत धामणे, सचिव सुधाकर साळी व सर्व संस्था पदाधिकारी, माध्यमिक मुख्याध्यापक नितीन पवार सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पालकांनी कौतुक केले.