मोदींच्या सभा खर्चाची होणार पडताळणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 01:21 AM2019-04-24T01:21:44+5:302019-04-24T01:22:34+5:30
लोकसभा निवडणुकीतील युतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पिंपळगावी घेण्यात आलेल्या सभेवर झालेल्या खर्चाची माहिती गोळा करण्याचे काम निवडणूक यंत्रणेने सुरू केले असून, पंतप्रधान मोदी यांच्या सुरक्षाव्यवस्थेचा खर्च सोडून अन्य बाबींवर करण्यात आलेल्या खर्चावर लक्ष ठेवण्यासाठी आठ भरारी पथकांकडून माहिती मागविण्यात आली आहे.
नाशिक : लोकसभा निवडणुकीतील युतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पिंपळगावी घेण्यात आलेल्या सभेवर झालेल्या खर्चाची माहिती गोळा करण्याचे काम निवडणूक यंत्रणेने सुरू केले असून, पंतप्रधान मोदी यांच्या सुरक्षाव्यवस्थेचा खर्च सोडून अन्य बाबींवर करण्यात आलेल्या खर्चावर लक्ष ठेवण्यासाठी आठ भरारी पथकांकडून माहिती मागविण्यात आली आहे. स्टार प्रचारकाचा येण्या-जाण्याचा खर्च पक्षाच्या नावे तर अन्य खर्च उमेदवारांच्या नावावर टाकण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
पंतप्रधान मोदी यांच्या सभेची गेल्या काही दिवसांपासून युद्धपातळीवर तयारी सुरू करण्यात आली होती. त्यात जेसीबी, ट्रॅक्टर लावून मैदानाची साफसफाई करण्याबरोबरच मंडप उभारणी, व्यासपीठाची निर्मिती, डी झोन, व्हीआयपी प्रेक्षकांची सोय, झोननिहाय श्रोत्यांची बसण्याची व्यवस्था, महिला-पुरुष वेगळे कक्ष तयार करण्यासाठी जागोजागी बॅरिकेड्स व त्यावर लोखंडी जाळी बसवून भक्कम तटबंदी उभारण्यात आली होती. याशिवाय सात ठिकाणी वाहन पार्किंगची सोय करण्यात येऊन त्याठिकाणी पिण्याचे पाणी, जेवणाचे पॅकेट ठेवण्यात आले होते. याशिवाय शेवटच्या व्यक्तीस मोदी यांचे भाषण ऐकता यावे यासाठी जागोजागी डिजिटल स्क्रिन लावण्यात आले, शिवाय अत्याधुनिक ध्वनिक्षेपक यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली होती. याशिवाय पंतप्रधान यांच्या सुरक्षाव्यवस्थेचा विचार करता, व्यासपीठाला लागूनच ग्रीन हाउस तसेच पीएमओ कार्यालय तयार करण्यात आले होते. शिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठीदेखील खास कक्षाची निर्मिती करण्यात आली होती. कोट्यवधी रुपये या सभेवर खर्च झाले असण्याची शक्यता असली तरी, पंतप्रधान हे स्टार प्रचारक असल्याने त्यांच्या जाण्या-येण्याचा खर्च पक्षाच्या प्रचार खर्चात धरला जातो. मात्र अन्य बाबींवर करण्यात आलेला खर्च उमेदवारांच्या नावे धरण्याची तरतूद आहे. त्यामुळे मोदी यांचे ओझर विमानतळावर आगमन गृहीत धरून याठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या, दूध, ड्रायफ्रूटची व्यवस्था करण्यात आली. अशीच किंबहुना त्यापेक्षा अधिक व्यवस्था सभास्थळी करण्यात आली होती. या साऱ्या बाबी गृहीत धरून मोदी यांच्या सभेवर होणाºया खर्चासाठी आठ भरारी पथके तैनात करण्यात आली होती.
पहिल्या दिवसापासून यंत्रणेचे लक्ष
अधिकाऱ्यांच्या मते जाहीर सभेच्या तयारीवर निवडणूक यंत्रणा पहिल्या दिवसापासून लक्ष ठेवून होती. त्यानुसार प्रत्यक्ष सभेच्या दिवशी प्रत्येक बारीकसारीक गोष्टींची माहिती घेण्यात आली असून, आवश्यक ठिकाणी ध्वनीचित्रफित तयार करण्यात आली आहे. या खर्चाबाबत उमेदवार काय माहिती सादर करतात ते पाहिल्यानंतर निवडणूक यंत्रणा आपल्याकडील माहितीच्या आधारे जाहीर सभेचा खर्च मांडणार आहे. हा सारा खर्च संबंधित उमेदवारांच्या निवडणूक खर्चात समसमान धरला जाणार आहे.