खळ्यांवर कांदा विक्रीला शेतकऱ्यांचा अत्यल्प प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:15 AM2021-05-18T04:15:16+5:302021-05-18T04:15:16+5:30

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता नियंत्रण मिळविण्यासाठी गेल्या सहा दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील बाजार समित्यांमधील खरेदी-विक्रीचे व्यवहार दहा दिवसांसाठी पूर्णतः ...

Very little response from farmers to onion sales on threshing floor | खळ्यांवर कांदा विक्रीला शेतकऱ्यांचा अत्यल्प प्रतिसाद

खळ्यांवर कांदा विक्रीला शेतकऱ्यांचा अत्यल्प प्रतिसाद

Next

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता नियंत्रण मिळविण्यासाठी गेल्या सहा दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील बाजार समित्यांमधील खरेदी-विक्रीचे व्यवहार दहा दिवसांसाठी पूर्णतः बंद ठेवण्यात आले आहेत; परंतु बहुतांशी शेतकऱ्यांचा कांदा माल उघड्यावर असून शेतकऱ्यांच्या शेतमालाचे नुकसान होऊ नये म्हणून जिल्हा उपनिबंधकांच्या सल्ल्यानुसार येथील स्व. निवृत्ती काका देवरे कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करून पर्यायी व्यवस्था म्हणून सोमवारपासून बाजार समितीचे कामकाज सुरू करण्यात आले. मात्र, हे कामकाज पूर्ववत बाजार समितीच्या आवारात खुल्या पद्धतीने लिलाव न करता ज्या शेतकऱ्यांना आपला कांदा विक्री करावयाचा असेल त्यांनी संबंधित परवानाधारक कांदा व्यापाऱ्यांच्या खळ्यांवर जाऊन व्यापारी व संबंधित कांदा विक्रेता शेतकरी यांच्या समन्वयाने कांद्याचे दर ठरणार होते. शिवाय ज्या शेतकऱ्यांना बाजारभाव पटला नाही त्यांना अन्य दुसऱ्या व्यापाऱ्यांकडे कांदा माल घेऊन जाण्याची मुभा देण्यात आली होती; परंतु हे लिलाव त्या-त्या कांदा व्यापाऱ्यांच्या खळ्यांतच होणार असल्याने कोणता व्यापारी किती भाव देतो याबाबत कांदा उत्पादक शेतकरी संभ्रमावस्थेत सापडला आहे. त्यामुळे बाजार समितीने सुरू केलेल्या भाव भरून देण्याच्या प्रक्रियेला कांदा विक्रेते शेतकऱ्यांनी पाठ फिरविली असून, एका दिवसात पंधराशे ते दोन हजार वाहनांची आवक होणाऱ्या बाजार समितीत अवघ्या चाळीस ते पन्नास वाहनांची आवक झाली होती. त्यामुळे कोरोनाच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करून खुल्या पद्धतीने लिलाव प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी कांदा विक्रेत्या शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांनी केली आहे.

इन्फो

बाजारभावात घसरण

खुल्या पद्धतीने लिलाव सुरू होते तेव्हा उन्हाळी कांद्याचे दर जास्तीत जास्त १७०० रुपयांपर्यंत होते. त्याच प्रकारच्या कांद्यांना भाव भरून देण्याच्या प्रक्रियेदरम्यान १३०० ते १४०० रुपयांपर्यंत व्यापाऱ्यांकडून मागणी करण्यात आल्याचे कांदा विक्रीस आलेल्या शेतकऱ्यांनी बोलून दाखविले.

कोट....

व्यापाऱ्यांच्या खळ्यांवर कांदा विक्रीस आणला असता त्या कांद्यास एका खळ्यातील व्यापारी १००० रुपये, दुसऱ्या खळ्यातील व्यापारी १०५० रुपये, तर तिसऱ्या खळ्यातील व्यापारी ११०० रुपये दर ठरवतो. त्यामुळे कांदा विक्रीविषयी संभ्रम निर्माण होत असल्याने खुल्या पद्धतीने लिलाव सुरू करावेत.

- संभाजी देवरे, शेतकरी, उमराणे

कोट.....

निर्यातक्षम कांदा मालाला मागणी आहे; परंतु खळ्यात पाहिजे त्या प्रमाणात कांदा उपलब्ध होत नाही. खुल्या पद्धतीने लिलाव सुरू झाल्यास बाजारात प्रतवारीनुसार जास्त दराने बोली लावुून कांदा खरेदी करून मागणी पूर्ण करता येते.

- संतोष बाफणा, कांदा व्यापारी

फोटो- १७ उमराणे-१

खरेदीसाठी इच्छुक असतानाही कांंदा विक्रीसाठी वाहने न आल्याने व्यापाऱ्यांच्या खळ्यांवर असलेला शुकशुकाट.

===Photopath===

170521\17nsk_22_17052021_13.jpg

===Caption===

फोटो- १७ उमराणे-१ खरेदीसाठी इच्छुक असतांनाही कांंदा विक्रीसाठी वाहने न आल्याने व्यापाऱ्यांच्या खळ्यांवर असलेला शुकशुकाट. 

Web Title: Very little response from farmers to onion sales on threshing floor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.