दिवाळीत शहरामध्ये अत्यंत कमी वायू प्रदूषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2019 12:53 AM2019-11-09T00:53:32+5:302019-11-09T00:54:05+5:30
केंद्र शासनाने प्रदूषणाचा धोका असलेल्या शहरांमध्ये नाशिकचा समावेश केल्यानंतर शहराची हवा शुद्ध करण्यासाठी अभियान राबविण्याची तयारी सुरू असतानाच दिवाळीत मात्र फटक्यांचा जोर यंदा कमी असल्याने वायुप्रदूषणात घट झाली आहे. त्यामुळे नाशिककरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
नाशिक : केंद्र शासनाने प्रदूषणाचा धोका असलेल्या शहरांमध्ये नाशिकचा समावेश केल्यानंतर शहराची हवा शुद्ध करण्यासाठी अभियान राबविण्याची तयारी सुरू असतानाच दिवाळीत मात्र फटक्यांचा जोर यंदा कमी असल्याने वायुप्रदूषणात घट झाली आहे. त्यामुळे नाशिककरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
दरवर्षी दिवाळीदरम्यान राज्यातील हवेच्या गुणवत्तेची राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत तपासणी केली जाते. त्यानुसार यंदाही करण्यात आली. त्याचप्रमाणे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीनेदेखील तपासणी करण्यात आली. या हवा गुणवत्तेची आकडेवारी नुकतीच जाहीर करण्यात आली. त्यानुसार या वर्षाच्या दिवाळीत राज्यातील सर्वात वाईट हवेची गुणवत्ता उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी कल्याणमध्ये नोंदवली गेली. मात्र, या आकडेवारीनुसार राज्याच्या बहुतांश भागात मागील वर्षाच्या तुलनेत वायुप्रदूषण कमी असल्याचे नोंदवण्यात आले.
औरंगाबाद, चंद्रपूर, कल्याण, मुंबई, नाशिक, नवी मुंबई, पुणे, सोलापूर, ठाणे आणि नागपूर या सर्व दहा शहरांचे वायू गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) सणाच्या काळात चांगले, समाधानकारक आणि मध्यम पातळीवर मोजले गेले.
त्यातही नाशिकचे प्रदूषण दिवाळीच्या काळात अत्यंत कमी होते. ५ नोव्हेंबर रोजी तर नाशिक शहराचे वातावरण देशभरात उत्कृष्ट म्हणून नोंदवले गेले आहे.
एक्यूआय हे वातावरणातील प्रदूषकांच्या केंद्रीकरणाचे मोजमाप करणारे एकक आहे. वातावरणाच्या गुणवत्तेवर फटाके फोडण्यामुळे होणाºया परिणामाचे परीक्षण करण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे दिवाळीदरम्यान तीन दिवस वायुप्रदूषणाची पातळी मोजली गेली. एक्यूआय ३३ आणि ३१ हे दोन्हीही आकडे उत्तम एक्यूआय म्हणून ग्राह्य धरले जातात.