ज्येष्ठ रंगकर्मी नेताजी भोईर यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 12:06 AM2018-05-10T00:06:06+5:302018-05-10T00:06:06+5:30

नाशिक : गेल्या पाच दशकांहून अधिक काळ मराठी रंगभूमीवर लेखन, नेपथ्य, अभिनय, लोककला यामध्ये मुशाफिरी करणारे ज्येष्ठ रंगकर्मी, नाटककार आणि मूर्तिकार नेताजी आबाजी भोईर यांचे बुधवारी (दि. ९) पहाटेच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. दुपारी पंचवटी अमरधाम येथे शोकाकुल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

 Veteran artist Netaji Bhoir passes away | ज्येष्ठ रंगकर्मी नेताजी भोईर यांचे निधन

ज्येष्ठ रंगकर्मी नेताजी भोईर यांचे निधन

googlenewsNext
ठळक मुद्देनाट्यक्षेत्रावर शोककळा : नव्वदाव्या वर्षी घेतला अखेरचा श्वास१५ मे रोजी शोकसभा

नाशिक : गेल्या पाच दशकांहून अधिक काळ मराठी रंगभूमीवर लेखन, नेपथ्य, अभिनय, लोककला यामध्ये मुशाफिरी करणारे ज्येष्ठ रंगकर्मी, नाटककार आणि मूर्तिकार नेताजी आबाजी भोईर यांचे बुधवारी (दि. ९) पहाटेच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. दुपारी पंचवटी अमरधाम येथे शोकाकुल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
नेताजी भोईर यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, सुना व नातवंडे असा परिवार आहे. गेल्या काही महिन्यांपासून नेताजी आजारी होते. त्यामुळे त्यांचा सार्वजनिक सहभागही कमी झाला होता. बुधवारी पहाटे ५.१५ वाजेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचे सुपुत्र सुरेश यांनी नेताजींच्या पार्थिवाला अग्निडाग दिला. त्यांच्या अंत्ययात्रेला नाट्य व कला क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. पंचवटीतील पाथरवट गल्लीत आयुष्य घालविलेल्या नेताजी तथा दादांना नाट्यकलेचे धडे घरातूनच मिळाले होते. त्यांचे काका गजाननराव आणि बजूराव हेसुद्धा नाटकात कामे करायचे. ‘संगीत भक्त दामाजी’ या नाटकात एक बालकलाकार म्हणून त्यांच्या रंगभूमीवरील प्रवासाला सुरुवात झाली. त्यानंतर त्यांनी राजपूत ऐक्य मंडळाच्या माध्यमातून अनेक नाटकांमध्ये भूमिका साकारल्या. प्रसंगी स्त्री भूमिकाही त्यांना कराव्या लागल्या.  ‘उमाजी नाईक’ या नाटकात ते जिजाबाईची भूमिका करायचे. १५ आॅगस्ट १९४८ रोजी त्यांनी विजय नाट्य मंडळाची स्थापना केली आणि मंडळाच्या माध्यमातून त्यांनी सलग पन्नास वर्षे महाराष्टÑ शासनाच्या सांस्कृतिक संचालनालयाच्या वतीने भरविण्यात येणाऱ्या राज्य नाट्य स्पर्धेत नाटके सादर करत एक विक्रम नोंदविला. स्वत: संहिता लिहायची, स्वत:च दिग्दर्शन करायचे, स्वत:च नेपथ्यकाराची भूमिका निभवायची आणि प्रसंगी अभिनयही वठवायचा. अशी चौफेर कामगिरी बजावणारा हा अवलिया कलाकार वयाच्या नव्वदीतही रंगभूमीशी आपले नाते टिकवून होता. हौशी रंगभूमीवर नवोदितांना रंगमंच मिळवून देण्यात त्यांचे मोठे योगदान राहिले. त्यामुळे, हौशी कलावंतांसाठी नेताजी नेहमीच आधारवड राहिले. नेताजी स्वत: मूर्तिकार व नेपथ्यकार असल्याने त्यांच्या नाटकाचे भव्य-दिव्य नेपथ्य नेहमीच वैशिष्ट्यपूर्ण असायचे. रंगमंचावर सायकल आणि बुलेट चालविण्यासारखे अभिनव प्रयोगही आकर्षण असायचे. प्रशांत सुभेदारसह अनेक कलावंत त्यांनी रंगभूमीला दिले. ‘लाल कंदील’, ‘रामराज्य’, ‘अंतरी’, ‘काळाच्या पंज्यातून’, ‘जागं व्हा रे जागं व्हा’ आदी त्यांनी लिहिलेली नाटके गाजली. अनेक नाटकांना पारितोषिकेही मिळाली. जेमतेम आठवीपर्यंत शिकलेल्या नेताजींनी रंगभूमीवर लीलया वावरतानाच मूर्तीकलेतही स्वत:ची प्रतिमा निर्माण केली होती. गणेशोत्सवात दाखविण्यात येणाºया आराशीसाठी ते वेगवेगळ्या विषयांवर मूर्तीकाम करायचे. त्यांच्या देखाव्यांना राज्यभरातून मागणी असायची. त्यांचा स्वत:चा विजय ब्रास बॅण्डही होता. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेचे अध्यक्षपद त्यांनी काही वर्षे भूषविले होते. शिवाय, विविध संस्थांशी त्यांचा निकटचा स्नेह होता. रंगभूमीवरील कारकिर्दीबाबत त्यांना अनेक मान-सन्मान प्राप्त झाले. नाट्य परिषदेच्या वतीनेही त्यांना जीवनगौरव, बाबुराव सावंत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. वयाच्या ८०व्या वर्षी नाशिककरांच्या वतीने त्यांचा जाहीर नागरी सत्कारही करण्यात आला होता. मागील वर्षी झालेल्या राज्य नाट्य स्पर्धेत त्यांनी सादर केलेले ‘हे रंग जीवनाचे’ हे त्यांचे अखेरचे नाटक ठरले. रंगभूमी आणि मूर्तीकलेतील एक दादा माणूस गेल्याने नाशिककरांवर शोककळा पसरली आहे.

१५ मे रोजी शोकसभा
दिवंगत रंगकर्मी नेताजी भोईर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सार्वजनिक वाचनालय, अखिल भारतीय नाट्य परिषदेची नाशिक शाखा आणि विविध संस्थांच्या वतीने येत्या १५ मे रोजी सायंकाळी ६ वाजता प. सा. नाट्यगृहात शोकसभा आयोजित करण्यात आली आहे. चेहºयाला मेकअप करून निरोपआयुष्यभर चेहºयाला मेकअप करून रंगभूमी वर वावरणाºया नेताजी यांच्या इच्छेनुसार, अंत्यविधीप्रसंगी त्यांच्या चेहºयाला मेकअप करण्यात येऊनच अंतिम निरोप देण्यात आला. रंगभूषाकार एन.ललित यांनी मेकअप केला. आपण रंगभूमीवर एक रंगकर्मी म्हणून जगलो आणि अंतिम समयीही एक रंगकर्मी म्हणूनच आपल्याला निरोप द्यावा, अशी इच्छा नेताजींनी आपल्या कुटुंबीयांकडे प्रदर्शित करून ठेवली होती.

Web Title:  Veteran artist Netaji Bhoir passes away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य