ज्येष्ठ विनोदी साहित्यिक चंद्रकांत महामिने यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:17 AM2021-08-23T04:17:31+5:302021-08-23T04:17:31+5:30
नाशिक : मराठी साहित्यात निखळ विनोदी साहित्य निर्माण करणाऱ्या मोजक्या साहित्यिकांपैकी एक असलेले ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांत महामिने (८७) यांचे ...
नाशिक : मराठी साहित्यात निखळ विनोदी साहित्य निर्माण करणाऱ्या मोजक्या साहित्यिकांपैकी एक असलेले ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांत महामिने (८७) यांचे रविवारी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. साहित्य वर्तुळात दादा या नावाने सर्वज्ञात असलेल्या महामिने यांच्या निधनाने नाशिककर साहित्यप्रेमींमध्ये शोककळा पसरली.
महामिने यांच्या निधनाने साहित्य वर्तुळातील सर्व क्षेत्रात मुसाफिरी केलेला ज्येष्ठ तारा निखळला आहे. महामिने यांनी विनोदी साहित्य, ललितलेखन, नाट्यलेखन, बालकांसाठी कथासंग्रह, व्यंगकाव्ये असे विपुल लेखन केले असून त्यांची शंभरहून अधिक पुस्तके प्रकाशित झाली होती. प्रवराकाठची माणसं, मिस रामपूर बुद्रुक, गंगू आली रे अंगणी, इंद्रलोकी मधुचंद्र, घोडं मेलं येरझऱ्याने, हिसाबनीती, एक दिवसाचा मुख्यमंत्री, मदन बाधा, गावरान ठसका, सखे सोबती, दुसरा मधुचंद्र, सालंकृत प्रेयसीदान यासह त्यांची अनेक पुस्तके गाजली होती. ललित लेखसंग्रहांमध्ये साहित्य पालखीचे बेरके भोई, साहित्याचे स्मगलिंग, असा मी नंदीबैल, हसरी न्याहारी, पक्षांतरामी क्षणे क्षणे, हास्यजत्रेत मी ही विशेष चर्चिली गेली होती.
त्याशिवाय नाट्यलेखनाच्या क्षेत्रात त्यांनी कशासाठी ? बेडरुमसाठी !, हे असंच चालायचं आणि बायको झाली बॉस ही नाटके लिहिली होती. तसेच चार विनोदी एकांकिका आणि बालकांसाठी अनेकानेक पुस्तके लिहिली होती. त्याशिवाय ‘खाणावळ ते लिहिणावळ’ हे त्यांचे आत्मचरित्रदेखील प्रसिद्ध झाले होते. नाशिक आणि जळगाव आकाशवाणीसाठी नभोनाट्य, श्रुतिका आणि वगनाट्ये लिहिली होती. सावानाच्या जिल्हा साहित्य संमेलनासह अन्य तालुका संमेलनांचे अध्यक्षपददेखील त्यांनी भूषविले होेते. सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने २०१७ या वर्षी त्यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले होते. ‘राज्य शासकीय उत्कृष्ट वाड्.मय पुरस्कार, केशव वाड्.मय पुरस्कार, वि.मा.दी. पटवर्धन पुरस्कार, ताराबाई मोडक पुरस्कार, लक्ष्मीबाई टिळक पारितोषिक, गिरिजा कीर कथा पुरस्कार, खान्देशकन्या स्मिता पाटील साहित्य पुरस्कारासह विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते.
तब्बल चार दशकांहून अधिक काळ त्यांनी विनोदी लेखनात ठेवलेले सातत्य आणि लेखनातील प्रयोगशीलता ही वैशिष्ट्ये होती. राज्यभरातील शेकडो दिवाळी अंकांमध्ये त्यांच्या कथांना स्थान मिळाले होते. काही महिन्यांपूर्वी त्यांच्या पत्नीचे निधन झाल्यानंतर त्यांची प्रकृती खालावल्याने ते अंथरुणाला खिळून होते. त्यांच्या पार्थिवावर रविवारी सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
फोटो
२२महामिने