ज्येष्ठ साहित्यिक मनोहर शहाणे यांचे निधन
By धनंजय रिसोडकर | Published: February 5, 2024 04:45 PM2024-02-05T16:45:32+5:302024-02-05T16:45:54+5:30
गत आठवड्यात प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपचारासाठी पुण्याच्या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
नाशिक : ज्येष्ठ साहित्यिक, कादंबरीकार आणि अमृत या मराठीतील पहिल्या डायजेस्टचे माजी संपादक मनोहर मुरलीधर शहाणे यांचे पुण्यात सोमवारी (दि.०५) दुपारी दीडच्या सुमारास निधन झाले. ते ९४ वर्षांचे होते. राज्यातील मराठीच्या साठोत्तरी साहित्यिकांमध्ये त्यांना मानाचे स्थान होते.
गत आठवड्यात प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपचारासाठी पुण्याच्या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. त्यांची प्रदीर्घ कारकीर्द नाशिकमध्येच बहरली असली तरी ते सध्या पुण्यात त्यांच्या मुलाकडे रहात होते. शहाणे यांना राज्य साहित्य पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार यासह अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. कथासंग्रह, दीर्घकथा, लघुकादंबरी , कादंबरी असे गद्य साहित्यातील सर्व प्रमुख प्रकार त्यांनी हाताळले होते. अत्यंत विपरीत आर्थिक परिस्थितीत बालपण गेले असूनही अगदी शालेय वयातच नाटीका लिखाणापासून प्रारंभ झाला होता. शिक्षणानंतर नाशिकमध्येच दैनिकांमध्ये उपसंपादक, वृत्तसंपादक तसेच अमृत या मराठी डायजेस्टचे संपादक म्हणून प्रदीर्घ कारकीर्द गाजली होती. शहाणे यांच्या तब्बल अकरा कादंबऱ्या प्रसिद्ध झाल्या होत्या. मनुष्य म्हणजे नियतीच्या हातातील बाहुले असून त्याचे अस्तित्व क्षुद्र असल्याचा विचार मांडणाऱ्या साठोत्तरी काळातील साहित्यात मराठी कादंबरी जीवनाभिमुख बनविण्यात त्यांचे मोलाचे योगदान होते.