चणकापूरमधून विसर्ग
By admin | Published: February 18, 2016 10:24 PM2016-02-18T22:24:07+5:302016-02-18T22:24:38+5:30
दिलासा : भेंडी, मानूर, देवळा, रामेश्वर धरण भरणार
कळवण : चणकापूर धरणातून आज, गुरुवारी सकाळी उजव्या कालव्यात बिगर सिंचनासाठी ८० क्यूसेस पाणी सोडण्यात आले. यामुळे कळवण आणि देवळा तालुक्यातील काही गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. १९० दशलक्ष घनफूट पाणी सोडण्याचे आदेश पाटबंधारे विभागाला जिल्हाधिकाऱ्यांकडून प्राप्त झाल्यानंतर मालेगाव पाटबंधारे विभागाने पाणी सोडले. या पाण्याची चोरी होणार नाही यासाठी कोल्हापूर फाटा आणि देवळा येथील चणकापूर उजवा कालवा उपविभागाची यंत्रणा लक्ष ठेवून असणार आहे.
कालवा वहन क्षमता वाढवून १०० किंवा १२० क्यूसेसने कालवा चालवावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. १४ दिवस पाटबंधारे विभागाच्या अधिकारी व कर्मचारी वर्गाला चणकापूर उजव्या कालव्यावर तैनात राहण्याच्या सूचना दिल्या असून, पाणीचोरी करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
चणकापूर उजव्या कालव्याला पाणी सोडण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी मंगळवारी दिल्यानंतर बुधवारी पाणी सुटेल, असा विश्वास पाटबंधारे विभागाने दिला होता. मात्र बुधवारी पाणी न सुटल्याने शेतकरी बांधवांमध्ये खळबळ उडाली होती. पाटबंधारे विभागाने मालेगावी पाण्याबाबत बैठक असल्याचे सांगून वेळ मारून नेली. जिल्हाधिकारी कुशावह यांचे पाणी सोडण्याचे आदेश असताना मालेगावी पाण्याबाबत झालेल्या बैठकीबाबत आश्चर्य व्यक्त केले जात होते. कालव्याला १९० दशलक्ष घनफूट पाणी सोडण्याचे आदेश दिले. या पाण्यामुळे पिण्याच्या पाण्याचा व जनावरांच्या पाण्याचा प्रश्न सोडण्यास मदत होणार आहे. (वार्ताहर)