कुलगुरूंचे मौन; विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम

By admin | Published: July 17, 2016 12:25 AM2016-07-17T00:25:06+5:302016-07-17T00:26:06+5:30

कुलगुरूंचे मौन; विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम

Vice Chancellor; Confusion among students | कुलगुरूंचे मौन; विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम

कुलगुरूंचे मौन; विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम

Next

सतीश डोंगरे नाशिक
सुचेल तो अभ्यासक्रम सुरू करणाऱ्या ‘मुक्त’च्या निम्म्या अभ्यासक्रमांना विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) कात्री लावून विद्यापीठातील ‘मुक्त’ कारभारावरच लगाम लावला आहे. यूजीसीच्या या निर्णयामुळे साडेतीन लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले असून, कुलगुुरुंनी मौन धारण केल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमावस्था आणखी वाढली आहे, तर त्यांच्या या भूमिकेबाबत आश्चर्यही व्यक्त केले जात आहे.
सात लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी संख्या असलेल्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात १३५ अभ्यासक्रम शिकविले जात होते. मात्र यूजीसीने यातील ५७ अभ्यासक्रमांची मान्यता काढून घेतल्याने तब्बल साडेतीन लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. गेल्या काही वर्षांत विद्यापीठाने आवश्यक आणि गरजेचे अभ्यासक्रम सुरू करण्याऐवजी वाट्टेल ते अभ्यासक्रम सुरू करण्याचा सपाटा सुरू केला होता. या विद्यापीठाच्या कार्यकक्षेत अभ्यासक्रम होऊ शकतो किंवा नाही याचा विचार न करता आणि प्राधिकृत कौन्सील- परिषदा यांचा विचार न करता शिक्षणक्रम राबविल्याने यापूर्वीही अनेक शिक्षणक्रम वादात सापडले होते. दूरशिक्षण परिषद रद्द झाल्यानंतर विद्यापीठ अनुदान आयोगाकडे या विद्यापीठाची संलग्नता जाताच आयोगाने क्षमतेपेक्षा अधिक प्रवेश दिलेले एम फिल आणि पीएचडीचे अभ्यासक्रम स्थगित केले होते. विद्यापीठाच्या अनेक शिक्षणक्रमांच्या समकक्षतेचा वेळोवेळी प्रश्न उपस्थित झाला असताना या सर्व तांत्रिक आणि महत्त्वाच्या बाबी विचारात न घेता शिक्षणक्रमांचा पाऊस पाडण्याचा आणि इग्नुशी स्पर्धा करून विक्रमी विद्यार्थी मिळवण्याचा सपाटा सुरू केला. या गोंधळात शिक्षणक्रमांचा मूळ प्रश्न सुटला न गेल्यानेच यूजीसीला हा निर्णय घ्यावा लागला.
विशेष म्हणजे अभ्यासक्रमांची मान्यता काढल्याचे वृत्त माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर विद्यार्थ्यांना याबाबतची खबर लागली. तोपर्यंत विद्यापीठ प्रशासनाने याविषयी कुठलाही खुलासा करण्याची तसदीदेखील घेतली नाही. अर्थात ही भूमिका कुलगुरू डॉ. माणिक साळुंखे यांचीच असल्याचे विद्यापीठ कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे; मात्र या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये खळबळ उडाली असून, राज्यभरातील विद्यार्थी विद्यापीठात अभ्यासक्रमांविषयी चौकशी करीत आहेत. विद्यापीठाचा हेल्पलाइन क्रमांक तर सतत खणाणत आहे. मात्र कुलगुरुंनी याविषयी काहीही माहिती देऊ नये, अशी कर्मचाऱ्यांना एकप्रकारची तंबीच दिल्याने विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या शंकांचे कोणाकडूनही निरसन होत नाही. बरेचसे विद्यार्थी आदिवासी दुर्गम भागातील असून, ते याबाबत विद्यापीठामध्ये येऊन याविषयी चौकशी करीत आहेत; मात्र त्यांच्या नशिबीदेखील निराशाच येत आहे.
दरम्यान, कुलगुरुंच्या या मौनी कारभारामुळे कर्मचारी बुचकळ्यात पडले असून, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचे उत्तरे द्यायचे तरी कसे? असा प्रश्न आता त्यांच्यासमोरच उपस्थित झाला आहे. त्यातच विद्यापीठाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला असताना कुलगुरुंनी विद्यापीठात न राहता बाहेरगावी जाणे संयुक्तिक समजल्याने हा तिढा आणखीच वाढण्याची शक्यता आहे.

Web Title: Vice Chancellor; Confusion among students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.