आरोग्य क्षेत्र उच्चस्तरीय गटात कुलगुरु म्हैसेकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 12:12 AM2018-05-26T00:12:27+5:302018-05-26T00:12:27+5:30
जनसांख्यिकी दृष्टिकोनातून आरोग्य क्षेत्रातील विद्यमान नियामक आराखड्याचे मूल्यमापन करण्यासाठी तसेच संतुलित व वेगाने विस्तार करण्याकरिता केंद्र शासनाच्या पंधराव्या वित्त आयोगाकडून आरोग्य क्षेत्रातील विविध तज्ज्ञांचा अभ्यासगट तयार करण्यात आला आहे.
नाशिक : जनसांख्यिकी दृष्टिकोनातून आरोग्य क्षेत्रातील विद्यमान नियामक आराखड्याचे मूल्यमापन करण्यासाठी तसेच संतुलित व वेगाने विस्तार करण्याकरिता केंद्र शासनाच्या पंधराव्या वित्त आयोगाकडून आरोग्य क्षेत्रातील विविध तज्ज्ञांचा अभ्यासगट तयार करण्यात आला आहे. आरोग्य क्षेत्र उच्चस्तरीय अभ्यासगटात महाराष्ट आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. दिलीप म्हैसेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भारतातील आरोग्य क्षेत्राशी अधिक वेगवान व संतुलित वाढ होण्याच्या दृष्टिकोनातून हा अभ्यासगट अध्ययन करणार आहे. समाजातील उत्तम आरोग्यासाठी आरोग्याच्या परिणामांचा मापदंड ठरवून राज्य सरकारसाठी सद्य:स्थितीत असलेले आरोग्य विषयक वित्तीय नियोजन आणि करावयाच्या उपाययोजना आणि सुधारणा याबाबत अधिक व्यापकता येण्यासाठी व साधणे सुचविण्यासाठी काम सदर अभ्यासगट करणार आहे. आंतरराष्टय स्तरावरच्या आरोग्य क्षेत्राबाबत अध्ययन करून भारतातल्या स्थानिक प्रश्नांच्या अनुषंगाने येथील क्षेत्राच्या अधिक विकासाकरिता सद्य:स्थितीत असलेल्या कार्यपद्धतीत अधिक चांगले निकष व याबाबतही अध्ययन करण्याचे कार्य या अभ्यासगटाला सोपविले आहे. कुलगुरु म्हैसेकर यांच्या निवडीचे प्रति-कुलगुरु डॉ. मोहन खामगावकर, कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण, परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक, वित्त व लेखाधिकारी पंडित गवळी यांनी स्वागत केले आहे.