उपाध्यक्षांनी नाकारली २५ लाखांची ‘आॅफर’
By admin | Published: September 12, 2014 12:44 AM2014-09-12T00:44:11+5:302014-09-12T00:44:11+5:30
उपाध्यक्षांनी नाकारली २५ लाखांची ‘आॅफर’
नाशिक : जिल्हा परिषदेतील निधी नियोजनाचा वाद विभागीय आयुक्तांच्या दरबारी पोहोचला असतानाच, आता उपाध्यक्ष संपतराव सकाळे यांना हा वाद मिटविण्यासाठी २५ लाखांची गंगाजळी देण्याचा प्रयत्न झाल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे. ज्या कर्मचाऱ्याने ही ‘आॅफर’ आणली त्या कर्मचाऱ्यावर मात्र त्याच्या मूळ आस्थापनेच्या ठिकाणी त्याची रवानगी करण्याची तक्रार उपाध्यक्ष संपतराव सकाळे यांनी संबंधित विभागाच्या खातेप्रमुखांकडे केली आहे.
जिल्हा परिषदेच्या सेस निधीचे असमान वाटप झाल्याची तक्रार करीत जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष संपतराव सकाळे यांच्यासह चारही सभापती ज्योती माळी, अलका जाधव, राजेश नवाळे व सुनीता अहेर यांच्यासह तब्बल ३१ सदस्यांनी विभागीय आयुक्तांना जिल्हा परिषदेच्या बैठकांमध्ये विधिसंमत ठराव झाले नसल्याची तक्रार करून या प्रकरणी लक्ष घालण्याची विनंती केली आहे. या ३१ मधील राष्ट्रवादीच्या दोन आणि सेनेच्या दोन सदस्यांनी नंतर आमची तक्रार नसल्याचे पत्र प्रशासनाला दिले आहे. तसेच ४१ सदस्यांनी या निधी नियोजनाच्या वादात झालेले ठराव योग्य असून, अध्यक्षांनी केलेले नियोजन व्यवस्थित असल्याचे पत्र मुख्य कार्यकारी अधिकारी आणि विभागीय आयुक्तांना दिले
आहे.
दरम्यानच्या काळात अध्यक्ष जयश्री पवार यांनी दोन वेळा प्रशासनाला पत्र लिहून आपण केलेले नियोजन पुन्हा फेरनियोजन करण्यासाठी तत्काळ जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा बोलावण्याची मागणी केली होती. मात्र, कमी वेळेत विशेष सभा घेता येत नसल्याचे प्रशासनाने कळविले होते. आता या निधी नियोजनाला वेगळेच वळण लागले असून, उपाध्यक्ष संपतराव सकाळे यांना हा वाद मिटविण्यासाठी जिल्हा परिषदेतील एका कर्मचाऱ्याने मध्यस्थी करीत चक्क २५ लाखांची आॅफर दिल्यानंतर सकाळे यांनी त्यास नकार देत सर्व सदस्यांना समान न्याय द्या, आपल्याला काही नको, असे सांगत या कर्मचाऱ्यास उलटपावली परत पाठविल्याचे समजते. त्यानंतर गुरुवारी (दि. १२) उपाध्यक्षांनी संबंधित कर्मचाऱ्याची आस्थापना असलेल्या खातेप्रमुखास बोलावून घेऊन या कर्मचाऱ्याची मूळ आस्थापनेवर रवानगी करण्याची सूचना केली आहे. (प्रतिनिधी)