अध्यक्ष-उपाध्यक्षपदाची निवडणूक गुरुवारी
By admin | Published: March 13, 2016 12:16 AM2016-03-13T00:16:56+5:302016-03-13T00:30:11+5:30
जिल्हा मजूर संघ : अध्यक्ष पदासाठी सकाळे, मुळाणे आघाडीवर
नाशिक : जिल्हा मजूर सहकारी संघाच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, येत्या गुरुवारी (दि.१७) सकाळी १० वाजेपासून निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.
विभागीय उप सहनिबंधक सतीश खरे हे निवडणूक निर्णय
अधिकारी म्हणून कार्यरत राहणार असून, तिडके कॉलनी येथील जिल्हा मजूर संघाच्या सहकार भवन येथे ही निवडणूक होईल. निवडणुकीचा कार्यक्रम असा - सकाळी १०
वाजता मजूर संघाच्या उपस्थित मतदारांच्या स्वाक्षऱ्या इतिवृत्तावर घेणे, दहा ते सव्वादहा अध्यक्ष व उपाध्यक्ष पदांसाठी नामनिर्देशन पत्रे वाटप करणे व स्वीकृती, १०.३० ते १०.४५ नामनिर्देशन पत्र छाननी, १०.४५ ते ११.०० उमेदवारी अर्ज माघारी घेणे, ११.०० ते ११.१५ आवश्यकता भासल्यास मतदान व नंतर आवश्यकता असल्यास मतमोजणी निवडणूक कार्यक्रम राहणार आहे.
पाच वर्षांत पाच अध्यक्ष व उपाध्यक्ष होण्याची परंपरा कायम राहणार असून, पहिल्या वर्षी अनुभवी संचालक म्हणून संपतराव सकाळे व प्रमोद मुळाणे यांच्या नावांवर एकमत होण्याची शक्यता आहे. मागील काळातील केवळ पाच संचालक निवडून आले असून, त्यातही संपतराव सकाळे व शिवाजी रौंदळ हे दोनच संचालक बिनविरोध निवडून आले आहेत, तर अन्य तीन संचालकांना निवडणुकीला सामोरे जावे लागले आता संचालक मंडळाच्या निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लगेचच जिल्हा मजूर संघाच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदांच्या निवडीसाठी लॉबिंग सुरू झाले आहे. मागील काळातील अनुभव आणि सर्वांना सोबत घेऊन कामकाज करण्याची पद्धत पाहता मागील काळात अध्यक्ष पदाची काहीशा अल्प प्रमाणात धुरा सांभाळलेले जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष संपतराव सकाळे यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडू शकते.
कारण मजूर संघाच्या अध्यक्षपदी असतानाच त्यांची जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याने त्यांना अध्यक्षपद सोडावे लागले होते. दुसरे म्हणजे अध्यक्ष पदाने मागील पाच वर्षात हुलकावणी दिल्याने प्रमोद मुळाणे यांच्याविषयी काही संचालकांना सहानुभूती आहे. त्यामुळे त्यांचेही नाव अध्यक्षपदाच्या चर्चेत आहे. उपाध्यक्ष पदासाठी मात्र मागील कार्यकाळात तिघांना संधी मिळते की नवीन चेहऱ्याला पॅनलचे नेते राजेंद्र भोसले, केदा अहेर, दिलीप पाटील, शिवाजी रौंदळ हे संधी देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (प्रतिनिधी)