२५०० बोकडांचा बळी
By Admin | Published: February 11, 2017 12:41 AM2017-02-11T00:41:17+5:302017-02-11T00:41:41+5:30
म्हाळोबा यात्रा : ७० हजार भाविकांनी घेतले दर्शन
नांदूरशिंगोटे : धनगर समाजाचे कुलदैवत असलेल्या व दोडी परिसराचे ग्रामदैवत म्हाळोबा महाराज यात्रेच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवारी नवसपूर्तीसाठी सुमारे अडीच हजाराहून अधिक बोकडांचा बळी देण्यात आला. दिवसभरात सुमारे ७० हजार भाविकांनी दर्शन घेतले. यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात साजरे करण्यात येत आहेत.
दरवर्षी माघ पोर्णिमेस म्हाळोबा महाराजांची यात्रा भरते. नवसपूर्तीसाठी भाविक मोठ्या प्रमाणात बोकडबळी देतात. यावर्षी वधगृहातच बोकडबळी दिल्याने उघड्यावर बोकडबळी रोखण्यात यात्रा समिती व पोलीस प्रशासनाला यश मिळाल्याचे दिसून आले.
आज यात्रेच्या दुसऱ्या दिवशी पहाटे भक्तगणांच्या हस्ते म्हाळोबाची महापूजा करण्यात आली. त्यानंतर सकाळपासून वधगृहात बोकडबळी देण्यास प्रारंभ झाला. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी भाविकांची गर्दी मोठी गर्दी होती. मंदिराच्या शंभर फूट चारही बाजूंनी बॅरिकेटस उभारून दर्शन रांगा तयार करण्यात आल्या आहेत. यात्रेच्या शेवटच्या दिवशी शनिवारी स्थानिक भाविकांची मोठ्या संख्येने गर्दी होण्याची शक्यता असून भाविकांनी सहकार्य करण्याचे आवाहन यात्रा समितीने केले आहे.
नवसपूर्तीसाठी भाविकांकडून बोकळबळी दिल्यानंतर भाविक व मित्र परिवार भोजनाचा आस्वाद घेतांना दिसत होते. महिलांकडून नवसपूर्तीसाठी दिवसभर लोटांगण घेणे, दंडवत घालणे आदि कार्यक्रम सुरु होते. काही भाविक नवसपूर्तीसाठी गूळ- पेढे तसेच देवाला पूरणपोळीचा नैवद्य देत होते. गाभाऱ्यात गर्दी होऊ नये म्हणून पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
यात्रेसाठी खान्देश भागासह नाशिक, संगमनेर, नगर, श्रीरामपूर, निफाड, नांदगाव, सटाणा, देवळा, सांगवी, तळेगाव आदि भागातून धनगर समाजाचे भाविक पिकअप, ट्रॅक्टर, टेम्पो, जीप, रिक्षा आदि वाहनांतून यात्रास्थळी दाखल झाले होते. राज्य परिवहन महामंडळाने भाविकांची जाण्या येण्याची कुठलीही व्यवस्था केली नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली. दुपारी भक्तमंडळींनी म्हाळोबा मंदिराच्या पूर्वेला ‘पाऊलटेकडी’ येथे तळेगाव येथील मानाच्या काठीच्या भेटीनंतर जिल्हाभरातून आलेल्या मानाच्या काठ्यांची भेट घडविण्यात आली. ही काठ्यांची गुरशिष्य भेट म्हणून गेल्या अनेक वर्षापासूनची परंपरा सुरु आहे. यावेळी दोडी बुद्रुक येथील भक्तगण ढोल, सनई, ललकारी, धनगरी गजनृत्य सादर करीत पाऊल टेकडीकडे गेले. यावेळी गगणचुंबी काठीमहाल घेऊन देवभेट घडवली. (वार्ताहर)