चेहऱ्यातील साधर्म्याने निष्पाप तुषारचा बळी
By Admin | Published: May 27, 2017 12:13 AM2017-05-27T00:13:24+5:302017-05-27T00:13:33+5:30
नाशिकरोड :निकम याच्या खुनातील फरार संशयित बंडू मुर्तडक असल्याचे समजून हल्लेखोरांनी केलेल्या हल्ल्यात तुषार साबळे याचा बळी गेल्याची बाब समोर आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिकरोड : पंचवटीतील किरण निकम याच्या खुनातील फरार संशयित बंडू मुर्तडक असल्याचे समजून त्याचा काट काढण्यासाठी हल्लेखोरांनी केलेल्या हल्ल्यात निष्पाप तुषार साबळे याचा नाहक बळी गेल्याची बाब समोर आली आहे. गुरुवारी जेलरोड येथील मंगलमूर्तीनगर येथे टोळक्याने तुषारची भरचौकात हत्या केली होती. याप्रकरणी उपनगर पोलिसांनी वडाळा नाका महालक्ष्मी चाळीतील चौघा संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर तुषारचा चेहरा, आणि देहबोली संशयित बंडू मुर्तडकशी मिळतीजुळती असल्याने तुषारवर हल्ला करण्यात आल्याचे हल्लेखोरांनी सांगितले. उपनगर पोलिसांनी मोठ्या शिताफीने संशयित अक्षय आत्माराम अहिरे (२२), अमोल विष्णू गांगुर्डे (२६), करण राजू लोट (२१) रा. महालक्ष्मी चाळ, वडाळा नाका, नितीन किरण पवार (१९) रा. बजरंगवाडी या चौघांना अटक केली आहे. याबाबत माहिती देतांना पोलीस सूत्रांनी सांगितले की, पंचवटीतील पेठरोडवर गेल्या गुरुवारी रात्री किरण निकम याचा चौघा जणांनी धारदार शस्त्राने निर्घृण खून केला होता. याप्रकरणी संतोष उघडे, बंडू मुर्तडक फरार आहेत. फरारी मुर्तडक हा जेलरोड मंगलमूर्तीनगर परिसरात असल्याची माहिती अमोल गांगुर्डे याने गुरुवारी दुपारी शेखर निकम याला दिली. त्यानंतर निकम व इतर त्याचे साथीदार तीन गाड्यांमधून मंगलमूर्तीनगर परिसरात दाखल झाले. तर पवन लोट, सुमित लोट, अमोल गांगुर्डे, करण लोट आदी मोटारसायकलवरून मंगलमूर्तीनगर परिसरात आले.
हर्ष अपार्टमेंटच्या वाहनतळात असलेल्या बाकड्यावर अक्षय जाधव, तुषार साबळे व इतर दोघेजण गप्पा मारत बसले होते. चारचाकी व दुचाकी वाहनावरून आलेल्या हल्लेखोरांनी हवेत गोळीबार करत शस्त्रे घेऊन बाकड्यावर बसलेल्या या चौघांच्या मागे धावले. अक्षय व इतर दोघेजण इमारतीमध्ये पळाले. तर कसाऱ्याहून पाहुणा म्हणून आलेला तुषार हा इमारतीच्या पाठीमागील बाजूकडे धावला. फरारी बंडू मुर्तडक व तुषार साबळे यांची शरीरयष्टी एकसारखी असल्याने हल्लेखोरांनी बंडू समजून तुषार याच्यावर कोयते व इतर हत्यारांनी वार करून गंभीर जखमी केले. तर शेखर याने आपल्या जवळील गावठी कट्ट्यातुन तुषारच्या छातीच्या डाव्या बाजुला गोळी झाडली. यामध्ये तुषार जागेवरच गतप्राण झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
उपनगर पोलिसांनी गोपनीय माहिती नुसार चौघा संशयितांना त्यांच्या घरातून शुक्रवारी ताब्यात घेतले. गुन्ह्याची उकल उपनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाजीराव महाजन, दुय्यम पोलीस निरीक्षक महेंद्र चव्हाण, उपनिरीक्षक महेश शिंदे, गजानन इंगळे, गणेश जाधव, हवालदार के.टी. गोडसे, सुनील कोकाटे, विजय गवांडे, रोहित भावले, सुधीर काकड, किरण देशमुख, भगीरथ हांडोरे, सुनील लोहरे आदिंनी केली आहे.