कोयत्याचा धाक दाखवून येवल्याच्या डॉक्टरना लुटले
By admin | Published: June 15, 2015 11:26 PM2015-06-15T23:26:25+5:302015-06-15T23:34:03+5:30
कोयत्याचा धाक दाखवून येवल्याच्या डॉक्टरना लुटले
येवला : पुण्याहून सहकुटुंब परतत असताना येवल्याचे प्रथितयश डॉक्टर सचिन माणिकलाल शर्मा यांना कोपरगावनजीक जुन्या गंगेजवळ कोयता मानेला लावून ७८ हजार रुपयांचा ऐवज लुटल्याची घटना रविवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली. कोपरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली असून, लुटारू नेमके कोण याचा शोध पोलीस घेत आहेत.
येवल्याचे डॉ. सचिन शर्मा हे आपली पत्नी व मुलांना घेऊन कारने (एमएच १५ बीएन ९३८१) पुण्याहून येवल्याकडे येत होते. रविवारी रात्री ११ वाजता कोपरगाव येथील जुनी गंगा या ठिकाणी गाडी पंक्चर झाल्याने जॅक लावून गाडीचे चाक बदलत होते. दरम्यान, २० ते २२ वर्षे वयाचे साडेपाच फुट उंचीचे काळ्यासावळ्या रंगाचे दोन युवक बळजबरीने चाक खोलण्यासाठी मदत करू लागले. मदतीपोटी मी त्यांना १०० रुपये देऊ केले. दरम्यान, एकाने कोयता काढून दमबाजी करत पत्नीच्या पर्समध्ये असलेले १३ हजार रु पये, ४० हजार रुपयांची सोन्याची पोत, २५ हजार रुपयांचे दोन मोबाइल असा ऐवज लुटला, असे फिर्यादीत म्हटले आहे. संबंधित लुटारूंचे चेहरे ओळख परेड झाल्यास समजतील, असे डॉ. शर्मा यांचे म्हणणे आहे. या घटनेचा
तपास सहायक पोलीस निरीक्षक पूजा बक्षी करीत आहेत. (वार्ताहर)