काळजीवाहू सरकारमुळे बळीराजा काळजीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2019 05:30 PM2019-11-09T17:30:41+5:302019-11-09T17:31:05+5:30
मदतीबाबत संभ्रम : सत्तासंघर्ष मिटण्याची अपेक्षा
सुदर्शन सारडा
ओझर : नोव्हेंबर उजाडला तरी अवकाळी पाऊस पाठ सोडायला तयार नाही. त्यातून पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊन कोलमडलेल्या बळीराजाला उभारी देण्याची अपेक्षा सरकारकडून केली जात असतानाच राज्यातील सत्तासंघर्षात काळजीवाहू सरकारमुळे आता बळीराजाच काळजीत पडला आहे. काळजीवाहू मुख्यमंत्र्यांना कोणताही धोरणात्मक निर्णय घेण्याचे अधिकार नसल्याने शेतकऱ्यांना मिळणा-या तत्काळ मदतीविषयी संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे.
गेल्या महिनाभरापासून राज्यात कोसळणा-या अवकाळी पावसामुळे शेतीपिकांची मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे. विधानसभा निवडणुकीच्या धामधूमीत केवळ प्रचारसभांमध्ये शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याची आश्वासने नेत्यांनी दिली तर निकालानंतर जिल्ह्यात कोसळलेल्या अवकाळी पावसामुळे प्रचंड नुकसान झाल्याने आता राजकीय पक्षांचे नेते-लोकप्रतिनिधींचे पाहणी दौरे सुरू आहेत. या पाहणी दौ-याप्रसंगी शेतक-यांची विचारपूस करताना त्यांना नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर तत्काळ मदतीचे आश्वासन दिले जात आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून पंधरा दिवसांचा कालावधी लोटला तरी सत्तासंघर्षात नवीन सरकार आरुढ होऊ शकलेले नाही. त्यातच सत्ता स्थापनेसाठी कुणीही राजकीय पक्ष पुढे न आल्याने राज्यपालांनी देवेंद्र फडणवीस यांनाच काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहण्यास सांगितले आहेत. मात्र, काळजीवाहू मुख्यमंत्र्यांना कोणतेही धोरणात्मक निर्णय घेता येत नाही. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतक-यांना मिळणा-या मदतीविषयी साशंकता निर्माण झाली आहे. अवकाळी पावसामुळे प्रचंड नुकसान झालेल्या शेतक-यांना तातडीने पंचनामे होऊन भरीव आर्थिक मदतीची अपेक्षा आहे. त्यातच सरकारच स्थापन नसल्याने नोकरशाहीवर नियंत्रण उरलेले नाही. त्यामुळे पंचनाम्यांनाही विलंब लागतो आहे. त्याबाबत शेतक-यांना नाराजीचा सूर कायम आहे. सरकारच नसल्याने बळीराजाचा आवाज कोण ऐकणार अशी स्थिती निर्माण झाली असून काळजीवाहू सरकारमुळे बळीराजाच अधिक काळजीत पडला आहे. शेतक-यांना तातडीने मदत मिळाली नाही तर रब्बी हंगामावरही त्याचा परिणाम संभवतो. राज्यातील सत्तासंघर्ष तातडीने निवळावा आणि कोलमडून पडलेल्या बळीराजाला दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
नुकसानीचा टक्का अधिक
नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात मुसळधार पडलेला पाऊस अनेक ठिकाणी होत्याचे नव्हते करून गेला तर नुकसानीचा टक्का देखील पूर्वीपेक्षा अधिक वाढला. सरकारची मुदत शिल्लक असताना त्यावेळी सरकारकडून बळीराजाला दिलासा देण्याची अपेक्षा असताना सरकार स्थापन करु पाहणारे सत्तेच्या गणिताचा पेपर सोडविण्यात मग्न होते. आता विधानसभेची मुदत संपल्यानंतर काळजीवाहू मुख्यमंत्र्यांकडून कोणती अपेक्षा करायची, याबाबत संभ्रमाची स्थिती आहे.