साल्हेर किल्ल्यावर विजयदिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2022 12:44 AM2022-02-10T00:44:59+5:302022-02-10T00:45:48+5:30
शिवशाहीचा साक्षीदार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वाधिक उंच किल्ला साल्हेरच्या विजयोत्सवाला दि.९ फेब्रुवारी २०२२ रोजी तब्बल साडेतीनशे वर्षे पूर्ण झाल्याने सूर्याजी काकडे प्रतिष्ठानच्या मावळ्यांनी साल्हेर विजय दिवस साजरा केला.
सटाणा : शिवशाहीचा साक्षीदार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वाधिक उंच किल्ला साल्हेरच्या विजयोत्सवाला दि.९ फेब्रुवारी २०२२ रोजी तब्बल साडेतीनशे वर्षे पूर्ण झाल्याने सूर्याजी काकडे प्रतिष्ठानच्या मावळ्यांनी साल्हेर विजय दिवस साजरा केला.
विजयोत्सवाला ३५० वर्षे पूर्ण झाल्याने सूर्याजी काकडे प्रतिष्ठानतर्फे समाधीजवळ विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच समाधीची व दरवाजांची सजावट करून सर्व दरवाजांवर दहीभाताचा नैवेद्य ठेवला. महत्त्वाच्या बुरुजांवर भगवे ध्वज लावण्यात आले. गड शिवारातील देवतांची पूजा करून त्यांना गोडाचा नैवेद्य ठेवण्यात आला. चिमुकल्यांच्या घोषणांनी गड आसमंत दुमदुमला होता. यावेळी प्रत्येकाच्या चेहऱ्यावर विजय दिनाचा आनंद ओसंडून वाहत होता. नजीकच्या काळात छत्रपती शिवरायांच्या पहिल्या मैदानी लढाईच्या युध्दभूमीत शिवसृष्टी निर्माण होत असल्यामुळे भविष्यकाळात त्याला विशेष महत्त्व प्राप्त होणार आहे.
साल्हेरला दोन युद्धे झाली आहेत. यापैकी पहिले पौष पोर्णिमा शके १५९२ म्हणजे २६ डिसेंबर १६७० राेजी तर दुसरे मोठे युद्ध माघ शु. जया एकादशी शके १५९४ म्हणजे ९ फेब्रुवारी १६७२ रोजी झाले. या युद्धात साल्हेरचे किल्लेदार सूर्यरावजी काकडे धारातीर्थी पडले होते. त्यानंतर साल्हेर-मुल्हेर सहीत १४२२ गावे स्वराज्यात सामील झाली होती. म्हणून हा विजय दिवस साजरा केला जातो.