भारताच्या विजयाचा जल्लोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 12:32 AM2019-06-17T00:32:05+5:302019-06-17T00:33:03+5:30
विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताने पाकिस्तानचा पराभव करताच शहरात भारताच्या विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला. मध्यरात्री ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली, तर कॉलेजरोड परिसरातून तरुणांनी हातात तिरंगा घेत बाइक रॅली काढली.
नाशिक : विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताने पाकिस्तानचा पराभव करताच शहरात भारताच्या विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला. मध्यरात्री ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली, तर कॉलेजरोड परिसरातून तरुणांनी हातात तिरंगा घेत बाइक रॅली काढली. भारताचा विजय दृष्टिपथात येताच तरुणांनी ‘भारत माता की जय’ असा जयघोष करीत अगोदरच विजयोत्सवाला सुरुवात केली होती. नाशिकरोड येथेही तरुणांनी बिटको चौकात फटाके फोडून तिरंगा फडकाविला.
पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला पराभवाची धूळ चारल्यानंतर शहरात एकच जल्लोष करण्यात आला. कॉलेजरोडवर तरुणांनी बाइक रॅली काढून भारत मातेचा जयघोष केला. एकमेकांना विजयाच्या शुभेच्छा देत फटाक्यांची आतषबाजीही करण्यात आली. यामध्ये तरुणींचादेखील सहभाग होता. अनेक कुटुंबीयदेखील या विजयी जल्लोषात सहभागी झाले होते. काही तरुणांनी कॉलेजरोड येथून बाइक रॅली काढली. तरुणांची ही रॅली गंगापूररोड, शरणपूररोड मार्गे आली. ‘वेल डन इंडिया’ असे म्हणत तरुणांनी आनंद साजरा केला.
रविवारी खेळविण्यात आलेल्या सामन्याविषयी नाशिककरांमध्ये प्रचंड फिव्हर दिसून आला. शहरातील एका मॉलमध्ये लावण्यात आलेल्या मोठ्या स्क्रीनवर हा सामना बघताना प्रत्यक्षात मैदानात प्रेक्षकांकडून होणारा जल्लोष या ठिकाणी जाणवला. अनेकांनी हातावर आणि गालावर तिरंगा ध्वज रंगवून घेतला होता तर काही तरुणांनी तिरंगा फडकावत भारताच्या नावाचा जयघोष केला.
रविवार असल्यामुळे घरातील प्रत्येकाने या सामन्याचा आनंद घेतला तर रिक्षा स्टॅन्डवर रिक्षाचालक मोबाइलवर लाईव्ह सामन्याचे प्रक्षेपण पाहताना दिसत होते.
सोशल मीडियावर देशभक्ती
भारत-पाकिस्तान यांच्यातील सामन्यापूर्वीच खासगी वाहिन्यांवर सुरू झालेल्या जाहिरातबाजीवरून दोन्ही देशांमधील वातावरण तापले होते. त्याचात धागा पकडून सामन्याच्या दिवशी सोशल मीडियावर भारताच्या जयजयकाराच्या अनेक पोस्ट व्हायरल झाल्या. पाकिस्तानला पराभूत केलेल्या अनेक सामन्यांच्या क्लिप्स तसेच दोन्ही देशांमधील खेळाडूंचे मैदानावरील वादाच्या क्लिप्स दिवसभर सोशल मीडियावर फिरत होत्या. विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान सहा वेळा आमनेसामने आले आणि सहाही वेळेला भारताने पाकिस्तानला धूळ चारली, या विषयीचे अनेक गमतीशीर पोस्ट एकमेकांना शेअर करण्यात आल्या.
एम़ जी़ रोडवर दुपारी शुकशुकाट
सामन्याची वेळ दुपारी ३ वाजेची असल्याने दुपारनंतर रस्त्यावर अभावानेच वाहतूक दिसत होती. रविवारची सुटी आणि हायहोल्टेज सामना असल्यामुळे अनेकांनी घरात बसून या सामन्याचा आनंद घेतला. त्यामुळे दुपारनंतर रस्त्यांवर शुकशुकाट होता. नेहमीच गजबजलेल्या महात्मा गांधीरोड, सीबीएस आणि रविवार कारंजा परिसरात नेहमीपेक्षा कमी गर्दी होती. महात्मा गांधी रोडवर तर शुकशुकाट पसरला होता.