रहाळकर पॅनलचा दणदणीत विजय नाएसो निवडणूक : प्रतिस्पर्धी एनएस पॅनलला अवघी एक जागा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 01:35 AM2017-12-18T01:35:34+5:302017-12-18T01:36:19+5:30
नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या त्रैवार्षिक निवडणुकीत सूर्यकांत रहाळकर पॅनलच्या उमेदवारांनी विजय मिळवला
नाशिक : नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या त्रैवार्षिक निवडणुकीत सूर्यकांत रहाळकर पॅनलच्या उमेदवारांनी विजय मिळवला तर प्रतिस्पर्धी एन.एस. पॅनलला केवळ एका जागेवर विजय मिळविता आला. संस्थेच्या पेठे विद्यालयात झालेल्या या मतदान प्रक्रियेत सुमारे ७५ टक्के मतदान झाले.
अध्यक्षपदासाठी सूर्यकांत रहाळकर यांची यापूर्वीच बिनविरोध निवड झाली आहे. तर उपाध्यक्षपदासाठी दोन, कार्यवाहपदासाठी एक आणि कार्यकारी मंडळासाठी आठ जागांसाठी मतदान घेण्यात आले. या निवडणुकीत सुहास अष्टपुत्रे प्रणीत एन.एस. पॅनलमधील कार्यकारी मंडळातील केवळ एकमेव उमेदवार स्नेहमयी भिडे निवडून आल्या.
नाशिक एज्युकेशन सोसायटी ही शिक्षकांनी चालवलेली संस्था असून, संस्थेच्या निवडणुका हा आमच्या दृष्टीने गौण मुद्दा आहे. आता निवडणूक प्रक्रिया संपली असून, सर्वजण पुन्हा एक दिलाने कामाला लागतील. विजयी आणि पराभूत उमेदवारांना एकत्र घेऊनच काम केल्याने संस्थेचा विकास होणार आहे. शिक्षकांचा विश्वास जिंकणे ही आमच्या दृष्टीने महत्त्वाची बाब आहे. - सूर्यकातं रहाळकर, नवनिर्वाचित अध्यक्ष
निवडणूकीत काहीशी चुरस निर्माण होणे हे स्वाभाविक असले तरीही आता निवडणूक संपल्यानंतर कटूताही संपली आहे. मतदारांच्या प्रत्यक्ष भेटी, शाळेत जाऊन शिक्षकांना भेटणे तसेच फेलोज्ला घरी जाऊन भेटीगाठी घेत आणि यानिमित्ताने संपर्क साधण्याची मिळालेली संधी यामुळे विजयाचा मार्ग सुकर झाला. नव्याने निवडून आलेल्या सदस्यांबरोबर पूर्वी सुरू केलेले प्रकल्प पुन्हा सुरू करणार.
- प्रा. दिलीप फडके, नवनिर्वाचित उपाध्यक्ष