वडांगळी विद्यालय : ३०० विद्यार्थिनींचा सहभाग जागर स्त्रीशक्तीचा कार्यक्रमातून उलगडला कर्तबगार महिलांचा इतिहास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2018 12:05 AM2018-03-05T00:05:26+5:302018-03-05T00:05:26+5:30
सिन्नर : स्त्री ही शक्तीचे, ऊर्जेचे सामर्थ्यशाली रूप असून, ते तिच्या विविध क्षेत्रातील कर्तृत्वसंपन्न यशस्वी संचाराने सिद्ध केल्याची वास्तवता ‘जागर स्त्रीशक्तीचा’ या कार्यक्रमाद्वारे अधोरेखित केली.
सिन्नर : स्त्री ही शक्तीचे, ऊर्जेचे सामर्थ्यशाली रूप असून, ते तिच्या विविध क्षेत्रातील कर्तृत्वसंपन्न यशस्वी संचाराने सिद्ध केल्याची वास्तवता वडांगळी येथील मविप्रच्या न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थिंनी सादर केलेल्या ‘जागर स्त्रीशक्तीचा’ या कार्यक्रमाद्वारे अधोरेखित केली. पौराणिक काळातील दैत्यांचे निर्दालन करणारी आदिमाया आदिशक्ती, मध्ययुगातील रझिया सुलतान, राणी पद्मावती ते नजकीच्या इतिहासातील व आधुनिक काळातील कर्तबगार महिला असा स्त्री कर्तृत्वाचा धांडोळा घेत भविष्यात स्त्री जन्माच्या घटत्या संख्येमुळे उद्भवणाºया भीषण संकटाकडेही या कार्यक्रमातून उपस्थितांचे लक्ष वेधण्यात आले. तीनशेपेक्षा अधिक विद्यार्थिनींचा सहभाग असलेल्या आणि मनोरंजनाबरोबरच स्त्रीयांविषयक सामाजिक प्रश्नांसंबधी प्रबोधन करणाºया या कार्याक्रमास महिलांसह प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद लाभला. ओरी चिरस्या, नन्ही सी गुडीयॉँ, दमलेल्या बाबाची कहाणी, मला जन्माला येऊ द्या, मुलगी झाली हो या पथनाट्यांसह हळद लावा अंगाला, नवरा आला मांडवापाशी, लेक चालली सासरला या गीतांसह रंगलेला लग्नसोहळा अशा भावस्पर्शी प्रयोगांनी हा कार्यक्रमास वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले. शरद रत्नाकर, सांस्कृतिक विभागप्रमुख राजेंद्र भावसार, संदीप पडवळ, आर. के. तांबे आदींसह सर्वच शिक्षक व कर्मचाºयांनी कार्यक्रमासाठी मेहनत घेतली. या कार्यक्रमासाठी प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात बक्षिसे देऊन बालकलाकरांचे कौतुक केले. जिल्हा परिषद सदस्य वैशाली खुळे, सरपंच सुनीता सैद, शालेय समितीचे अध्यक्ष सुदेश खुळे, आर. जे. थोरात, रंगनाथ खुळे आदींसह पदाधिकारी व पालक उपस्थित होते.