सर्व कारागृहात लवकरच व्हिडीओ कॉन्फरन्स सुविधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2017 12:30 AM2017-07-22T00:30:34+5:302017-07-22T00:30:50+5:30
नाशिकरोड : येत्या दोन-तीन महिन्यांत राज्यातील सर्व कारागृहात व्हिडीओ कॉन्फरन्स सुविधा सुरू होईल अशी माहिती राज्याच्या कारागृह विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक विठ्ठल जाधव यांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिकरोड : येत्या दोन-तीन महिन्यांत राज्यातील सर्व कारागृहात व्हिडीओ कॉन्फरन्स सुविधा सुरू होईल अशी माहिती राज्याच्या कारागृह विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक विठ्ठल जाधव यांनी दिली.
कारागृह विभागाच्या विशेष पोलीस महानिरीक्षक पदी काही दिवसांपूर्वीच रूजू झालेले विठ्ठल जाधव हे मुंबईच्या भायखळा कारागृहात झालेल्या महिला कैद्यांच्या खुनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व कारागृहांना भेटी देऊन आढावा घेत आहे. शुक्रवारी दुपारी नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहाला भेट दिल्यावर पत्रकारांशी बोलताना जाधव म्हणाले की, ब्रिटिश काळापासून असलेल्या पद्धतीनुसारच कारागृह विभागाचे काम सुरू आहे. उस्मानाबाद वगळता राज्यातील सर्व कारागृहात क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात कैदी आहे. त्यातच कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे कारागृह प्रशासनाच्या कामात काही अडचणी निर्माण होत असल्याचे जाधव यांनी स्पष्ट केले. कर्मचारी भरतीबाबत राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविला असल्याचे जाधव यांनी सांगितले.
न्यायालयीन कामकाजासाठी कैद्याला कारागृहातून न्यायालयात ने-आण करण्यासाठी अनेक तांत्रिक अडचणी निर्माण होतात. तसेच काही वेळा गैरप्रकारदेखील घडतो. यामुळे येत्या दोन-तीन महिन्यांत राज्यातील सर्व कारागृहात व्हिडीओ कॉन्फरन्स सुविधा सुरू होईल असे जाधव यांनी स्पष्ट केले. कारागृहाच्या एका कर्मचाऱ्यांने केलेल्या १३ तक्रारीबाबत चौकशी सुरू आहे. तसेच कारागृहात होणाऱ्या मोबाईल वापराबाबत जामर बसविण्याचा आढावा घेऊन निर्णय घेण्यात येईल असे जाधव यांनी स्पष्ट केले. यावेळी जाधव यांनी कारागृह अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. काम करताना येणाऱ्या अडचणी, समस्या याबाबत अधिकारी, कर्मचाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले. कारागृहातील साने गुरूजी कक्षास जाधव यांनी भेट देऊन पाहणी केली.