पंचनामे ६ तारखेपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश व्हिडीओ कॉन्फरन्सिंग : अचूक पंचनाम्याच्या सूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2019 01:46 AM2019-11-05T01:46:43+5:302019-11-05T01:47:00+5:30
नाशिक : अवकाळी पावसामुळे खरीप पिकांचे झालेले नुकसान मोठे असल्याने या पिकांचे पंचनामे युद्धपातळीवर सुरू आहेत. या पंचनाम्याची माहिती राज्याचे मुख्य सचिव अजय मेहता यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतली. येत्या ६ तारखेपर्यंत सर्व पंचनामे पूर्ण करून अहवाल सादर करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी मुख्य सचिवांनी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. जिल्हानिहाय कृषी क्षेत्राचे किती नुकसान झाले याची त्यांनी माहिती त्यांनी घेतली. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पंचनाम्याच्या कामांना गती देतानाच ते अचूक होतील याकडेही लक्ष द्यावे, अशी सूचना मुख्य सचिवांनी केली. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासाठी राज्य शासनाने दहा हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्याच्या वाटपासाठी पंचनामे वेळेत होणे आवश्यक असल्याचे मुख्य सचिवांनी सांगितले. सर्व पंचनामे दि. ६ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होणे आवश्यक आहे. अगदीच अपवादात्मक परिस्थिती निर्माण झाल्यास येत्या ८ तारखेपर्यंत ते पूर्ण झाले पाहिजे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंग बैठकीस कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोर राजे निंबाळकर, आपत्ती व्यवस्थापन संचालक अभय यावलकर तसेच राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी तसेच मुख्य कार्यकारी यावेळी उपस्थित होते.