VIDEO - नाशिककर साजरा करणार बारा हजार रोपट्यांचा ‘बर्थ-डे’

By Admin | Published: June 3, 2017 01:47 PM2017-06-03T13:47:39+5:302017-06-03T18:30:53+5:30

अझहर शेख / आॅनलाइन लोकमत नाशिक नाशिक : ‘झाडे लावा, झाडे जगवा’ या घोषवाक्यानुसार प्रत्यक्ष कृतीतून दोन वर्षांपूर्वी वनविभागाच्या ...

VIDEO - Nashik will celebrate birth day of 12 thousand saplings | VIDEO - नाशिककर साजरा करणार बारा हजार रोपट्यांचा ‘बर्थ-डे’

VIDEO - नाशिककर साजरा करणार बारा हजार रोपट्यांचा ‘बर्थ-डे’

Next

अझहर शेख / आॅनलाइन लोकमत नाशिक
नाशिक : ‘झाडे लावा, झाडे जगवा’ या घोषवाक्यानुसार प्रत्यक्ष कृतीतून दोन वर्षांपूर्वी वनविभागाच्या जागेत आपलं पर्यावरण संस्थेने वनमहोत्सव आयोजित करून लोकसहभागातून सुमारे अकरा हजार रोपांची लागवड करण्यात आली होती. शहराच्या इतिहासात प्रथमच एकाच दिवसात एवढ्या मोठ्या संख्येने रोपे नाशिककरांनी लावत २०१५साली विक्रम केला. ‘देवराई’ साकारण्याच्या हेतूने हजारो हात यावेळी एकत्र आल्याचे चित्र पहावयास मिळाले अन् या निमित्ताने नाशिककरांचे वृक्षप्रेम अधोरेखित झाले. येथील रोपट्यांची दमदार वाढ झाली असून येत्या सोमवारी (दि.५) जागतिक पर्यावरण दिनाला येथील रोपटे दोन वर्षांची होत आहे. या हजारो रोपट्यांचा ‘बर्थ-डे यानिमित्ताने नाशिककर साजरा करणार आहे.
केवळ वृक्षारोपणाचा ‘इव्हेंट’ न करता लावलेली झाडे जगविण्याची जिद्द प्रत्येकाच्या मनात निर्माण व्हावी, या उद्देशाने येत्या पर्यावरण दिनाच्या औचित्यावर येथील शंभर प्रजातीच्या बारा हजार रोपट्यांचा वाढदिवस साजरा करण्याचा अभिनव उपक्रम आपलं पर्यावरण संस्थेच्या वतीने राबविला जाणार आहे. यानिमित्त सातपूर येथील ‘देवराई’ अर्थात जुन्या फाशीच्या डोंगरावर जय्यत तयारी सुरू आहे. देवराई सजविली जात आहे. येथील रोपट्यांभोवती सुंदर फुलांची आरास करण्यात येणार आहे. शहराचे महापौर रंजना भानसी, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, उपवनसंरक्षक (पश्चिम) टी.बियूला मती यांच्यासह संस्थेच्या महिला स्वयंसेवक सकाळी देवराईचे औंक्षण करून वृक्षपूजा करणार आहे.



वृक्ष संवर्धनाबाबत हवे गांभीर्य
येत्या ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिन सर्वत्र साजरा केला जाणार आहे. गेल्या वर्षीदेखील आपलं पर्यावरण संस्थेने म्हसरूळजवळील वन कक्षाच्या जागेत सुमारे साडेपाच हजार रोपांची लागवड करत पर्यावरण दिन साजरा केला होता. या दोन्ही ठिकाणांच्या रोपट्यांच्या संवर्धनाची पूर्णपणे जबाबदारी या संस्थेने सलग तीन वर्षांसाठी स्वीकारली आहे. लोकसहभागातून यशस्वी होणाऱ्या या प्रकल्पांपासून प्रेरणा घेऊन नागरिकांनी पर्यावरणपूरक जागृती दाखवावी, हा झाडांचा वाढदिवस साजरा करण्यामागचा संस्थेचा हेतू आहे.

न विसरता नाशिककर देणार त्यांच्या झाडांना ‘गिफ्ट’
यंदा मोठ्या संख्येने रोपट्यांची लागवड ओसाड जागेवर न करता या संस्थेने देवराईवर सर्व नाशिककरांना त्यांनी लावलेल्या रोपांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी सोशल मीडियावरून निमंत्रित केले आहे. पर्यावरण दिनाच्या औचित्यावर येथे येऊन झाडांना पाच लिटर पाण्याने भरलेला कॅन ‘गिफ्ट’ करण्याचे आवाहन व्हायरल झालेल्या पोस्टमधून करण्यात आले आहे. लोकांमध्ये झाडांविषयी आणि जैवविविधतेविषयी जनजागृती व्हावी, वृक्ष जगविण्याची जिद्द वाढावी हा यामागील उद्देश असल्याचे संस्थेचे अध्यक्ष शेखर गायकवाड यांनी सांगितले.

केवळ चर्चा नव्हे, कृतीशील पाऊल
दुष्काळ, वाढते तपमान, पर्यावरण , जंगलतोड, पर्जन्यमान, पाणीटंचाई, अशा सर्वच मुद्दयांवर गल्लीपासून दिल्लीपर्यंत चर्चा झडतात; मात्र या चर्चेची फलनिष्पती अपवादानेच दिसून येते. माणूस म्हणून आपण निसर्गासाठी कितपत योगदान देतो? धकाधकीच्या जीवनात निसर्गाचा गांभीर्याने विचार करण्यासाठी आपल्याकडे वेळ आहे का? आपण आपली जीवनशैली बदलून निसर्ग व जैवविविधतेच्या संवर्धनासाठी प्रयत्न करणार आहोत, की फक्त प्रबोधनपर संदेशांची सोशल मिडियावरून देवाणघेवाण करत लोकांनाच ब्रम्हज्ञान सांगण्यातच वेळ वाया घालविणार? कृतीशिल उपक्रम हाती घेत आपल्या शहराचे पर्यावरण कसे टिकून राहील या दृष्टीने प्रयत्न करण्याची खरी गरज आहे. नाशिकमध्ये मागील एक तपापासून आपलं पर्यावरण संस्था ‘हरित नाशिक’ साकारण्यासाठी अविरत श्रम करीत आहे. २०१५साली सातपूरला ‘देवराई’ निर्मितीसाठी अकरा हजार रोपट्यांची लागवड, २०१६ साली म्हसरूळजवळ ‘वनराई’ विकसीत करण्यासाठी ओसाड जागेवर साडेपाच हजार रोपांची लागवड ‘वनमहोत्सव’ आयोजनातून करण्यात आली. हे दोन्ही इव्हेंट केवळ तासाभरापुरते किंवा महिनाभरापुरते नसून तब्बल तीन ते चार वर्षांपर्यंत दोन्ही ठिकाणी लावण्यात आलेल्या रोपट्यांच्या संवर्धनाची जबाबदारी संस्थेने स्विकारली आहे. या जबाबदारीचे भान ठेवत संस्थेचे हरित सेवक निष्ठेने रोपे जगविण्यासाठी धडपड करीत आहे. त्यांच्या क ष्टाचे चीज होत असून लावलेली रोपे बहरली असून दमदारपणे वाढ होत आहे.

https://www.dailymotion.com/video/x8451tl

Web Title: VIDEO - Nashik will celebrate birth day of 12 thousand saplings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.