सुशांतच्या घरी झालेल्या पुजाविधीचा व्हिडिओ व्हायरल; पंडित त्र्यंबकेश्वरमधील असल्याची चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2020 06:05 PM2020-08-10T18:05:23+5:302020-08-10T18:43:27+5:30
सुशांतने त्याच्या घरी कुटुंबासह कालसर्पशांतीचा पुजाविधी केल्याचा हा व्हायरल व्हिडिओ असल्याची जोरदार चर्चा आहे; मात्र कालसर्पशांतीची पुजा आद्य जोर्तिलिंग असलेल्या केवळ त्र्यंबकेश्वरमध्येच होऊ शकते.
नाशिक : सिनेअभिनेता बॉलिवुड स्टार सुशांतसिंग राजपुतच्या मृत्यूमागील गुढ अद्याप उकललेले नाही. दरम्यान, सुशांतसिंग याने आपल्या कुटुंबासह वांद्रयातील घरी केलेल्या पुजाविधीचा व्हिडिओ नुकताच सोशलमिडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत दिसणारे पंडीत त्र्यंबकेश्वरमधील असल्याच्या चर्चेला सोमवारी (दि.१०) सकाळपासून उधान आले आहे. त्र्यंबकेश्वर पुरोहित संघाने मात्र या बाबीचा इन्कार केला असून त्र्यंबकनगरीचा अन् त्या पुजाविधीचा कुठलाही संबंध नसल्याचे सांगत धार्मिकनगरीची बदनामी केल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार देणार असल्याचे पुरोहित संघाचे अध्यक्ष प्रशांत गायधनी यांनी स्पष्ट केले आहे.
सुशांतसिंह आत्महत्येप्रकरणाने बॉलिवुडला जबर हादरा बसला; मात्र महाराष्टÑासह बिहार राज्यातील राजकारणसुध्दा ढवळून निघाले आहे. सुशांतच्या आत्महत्येची चौकशी केली जात असताना आता त्याच्या वांद्रयातील घरात झालेल्या पुजाविधीचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने सोशलमिडियावर पुन्हा चर्चा रंगली आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये दिसणारे पुजाविधी करणारे गुरुजी त्र्यंबकेश्वरमधील असल्याची बोलले जात आहे. त्र्यंबकनगरीच्या बाहेर एका लहानशा आश्रममधील ते पुजारी निवासी असल्याचे समजते; मात्र जेव्हापासून हा व्हिडिओे व्हायरल झाला तेव्हापासून पुजारी भूमिगत झाले आहे.
सुशांतने त्याच्या घरी कुटुंबासह कालसर्पशांतीचा पुजाविधी केल्याचा हा व्हायरल व्हिडिओ असल्याची जोरदार चर्चा आहे; मात्र कालसर्पशांतीची पुजा आद्य जोर्तिलिंग असलेल्या केवळ त्र्यंबकेश्वरमध्येच होऊ शकते. कारण त्या पुजेला स्थानमहात्म्य प्राप्त आहे, असे पुरोहित संघाचे अध्यक्ष प्रशांत गायधनी यांनी सांगितले. सुशांतच्या घरी नेमकी कोणती पुजा झाली? याबाबतदेखील खात्री पटू शकलेली नाही.
त्या परप्रांतीय पुजाऱ्याचा आणि त्र्यंबकेश्वरचा काहीही संबंध नाही. लाखो रुपये घेऊन कुठलीही पुजा होत नसते. आपल्या सोशलमिडियावर लोकांना भीतीदायक पोस्ट टाकून लाखो रुपये उकळण्याचे प्रकार काही लोक करतात. धार्मिकनगरी त्र्यंबकेश्वरची बदनामी यामुळे होत असून याबाबतची तक्रार त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात करणार आहे.
- प्रशांत गायधनी, अध्यक्ष, पुरोहित संघ, त्र्यंबकेश्वर