विधान परिषद निवडणूक : सर्वपक्षीयांचा सावध पवित्रा नारायण राणे यांच्या नावाने इच्छुक गर्भगळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 01:43 AM2017-12-13T01:43:18+5:302017-12-13T01:44:22+5:30
विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून भाजपातर्फे नारायण राणे यांच्या नावाची चर्चा सुरू होताच, भाजपाकडून इच्छुक असलेल्या किंबहुना गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्यांच्या पोटात गोळा उठला असून, मित्रपक्ष शिवसेना व कॉँग्रेस आघाडीने याबाबत सावध पवित्रा घेण्यास सुरुवात केली आहे.
नाशिक : विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून भाजपातर्फे नारायण राणे यांच्या नावाची चर्चा सुरू होताच, भाजपाकडून इच्छुक असलेल्या किंबहुना गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्यांच्या पोटात गोळा उठला असून, मित्रपक्ष शिवसेना व कॉँग्रेस आघाडीने याबाबत सावध पवित्रा घेण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, राणे यांनीदेखील नाशिकमधून उमेदवारीबाबत होणारी चर्चा निरर्थक नसल्याचे म्हटल्यामुळे येणाºया काळात त्याभोवतीच राजकारण फिरण्याचे संकेत आहेत.
जिल्ह्यातील इगतपुरी व त्र्यंबकेश्वर नगरपालिकेच्या निवडणूक निकालानंतर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील राजकीय पक्षांचे बलाबल स्पष्ट झाले असून, नजीकच्या काळात त्यात आता कोणतीही भर पडण्याची शक्यता नाही. त्यामुळे सध्याच्या बळावरच सहा महिन्यांनी होऊ घातलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीचा फड रंगणार आहे. सध्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात शिवसेना सर्वात पुढे व दुसºया क्रमांकावर भाजपा असून, राष्ट्रवादी कॉँग्रेस व कॉँग्रेस अनुक्रमे तिसºया व चौथ्या क्रमांकावर आहे. शिवसेनेने यापूर्वीच भाजपासोबत कोणतीही निवडणूक न लढविण्याचे जाहीर केल्यामुळे साहजिकच सेना व भाजपा परस्पर विरोधात लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सेनेचे स्थानिक स्वराज्य संस्थेत असलेले वर्चस्व पाहता अनेकांनी त्यावर दावेदारी करण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे गेल्या निवडणुकीत अवघ्या एका मताने पराभूत झालेले शिवाजी सहाणे यांनी तर गेल्या निवडणुकीपासूनच स्वत:ची उमेदवारी एकतर्फी घोषित करून टाकली आहे. त्यात आता जिल्हा बॅँकेचे माजी अध्यक्ष नरेंद्र दराडे यांची भर पडली आहे. पक्षीय निष्ठेच्या निकषाचा विचार केल्यास सहाणे हे दराडेंपेक्षा उजवे ठरू शकतात, कारण दराडे यांची राजकीय भूमिका सोयीस्कररीत्या आजवर बदलत आल्याने भविष्यातही ते सेनेसोबत राहतीलच याची खात्री पक्षाला नाही. त्यातच राणे यांचे नाव पुढे आल्यास सेनेचे किती मतदार निष्ठावान राहतील, याविषयी खुद्द सेनेलाच शाश्वती नसल्यामुळे निवडणुकीत ‘रिस्क’ घेणाºयालाच उमेदवारी मिळू शकते. नारायण राणे यांच्यामुळे भाजपातील इच्छुकांचीही घालमेल वाढली आहे. पक्ष सत्तेवर आल्यापासून अनेकांना त्यांनी विधान परिषदेचा शब्द देऊन ठेवल्यामुळे अशा सर्वांचाच हिरमोड होणे स्वाभाविक आहे. अगदी त्र्यंबकच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या वळचणीला गेलेले राष्ट्रवादीचे परवेज कोकणी यांना तर प्रदेशाध्यक्ष दानवे यांनीच शब्द दिल्याचा छातीठोक दावा कोकणी समर्थक करीत आहेत. याशिवाय माजी जिल्हा परिषद सदस्य रत्नाकर पवार यांच्याही नावाची चर्चा होऊ लागली आहे. पवार यांच्या पत्नी मनीषा पवार या जिल्हा परिषदेच्या बांधकाम सभापती आहेत. पवार यांचे व्यवसायानिमित्त सर्वपक्षीय सदस्यांशी संबंध आहेत. या खेरीज माजी आमदार वसंत गिते, विद्यमान आमदार अपूर्व हिरे यांचे नाव गेल्या वर्षभरापूर्वीपासून पक्ष पातळीवर घेतले जात आहे. परंतु आता नारायण राणे यांच्या नावाबाबत पक्ष खरोखरच गंभीर असेल तर मग इच्छुकांचे काय? असा प्रश्न पक्षापुढे उभा ठाकणार आहे.
आघाडीत ‘बिघाडी’ करण्याचे काम
कॉँग्रेस व राष्टÑवादी कॉँग्रेसला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेच्या निवडणुकीत आघाडी करण्याशिवाय पर्याय नाही. परंतु सध्या आघाडीकडे काट्याची टक्कर देणारा उमेदवार दृष्टिपथात नाही. छगन भुजबळ यांची तुरुंगातून वापसी झाल्यानंतरच त्याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे. परंतु आघाडीने एकत्र लढून उमेदवार दिल्यास विजयाचा चमत्कार घडण्याची जेवढी शक्यता अधिक आहे, तितकेच आघाडीत ‘बिघाडी’ करण्याचे काम नारायण राणे सहजपणे करू शकतात, याची अनेकांना खात्री आहे. शिवाय मदतीला अपक्षांची लक्षणीय संख्या या निवडणुकीची रंगत वाढविण्यास तयार आहे.