दिंडोरी दुसरी बारामती; राष्ट्रवादीची कसोटी, शिवसेनेत चुरस, कोण तोडणार शिवबंधन?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2019 11:34 AM2019-09-28T11:34:54+5:302019-09-28T11:38:07+5:30
दिंडोरी विधानसभा मतदारसंघावर दीर्घकाळ काँग्रेसचे वर्चस्व राहिलेले आहे.
- धनंजय वाखारे
नाशिक : बारामतीनंतर सर्वात सुरक्षित मतदारसंघ म्हणून दिंडोरीकडे पाहणाऱ्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला यंदा मतदारसंघ राखण्यासाठी कठोर परिश्रम घ्यावे लागण्याची चिन्हे दिसून येत आहेत. मागील निवडणुकीत मोदी लाटेतही राष्ट्रवादीने विजय संपादन केला होता. आता विद्यमान आमदार नरहरी झिरवाळ यांच्या विरोधात यापूर्वी लढलेले धनराज महाले व रामदास चारोस्कर हे दोन्ही माजी आमदार शिवसेनेत दाखल झाल्याने झिरवाळांची कसोटी लागणार आहे.
दिंडोरी विधानसभा मतदारसंघावर दीर्घकाळ काँग्रेसचे वर्चस्व राहिलेले आहे. एक टर्म शेकाप, दोन टर्म जनता दल तसेच एक टर्म शिवसेना आणि तीन टर्म राष्ट्रवादीला कौल देणारा हा मतदारसंघ पक्षांतरामुळेही चर्चेत राहिला आहे. गेल्या पाच निवडणुकांचा धांडोळा घेतला तर १९९५ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे किसनराव चारोस्कर विजयी झाले होते. दुर्दैवाने, निकाल घोषित होण्यापूर्वीच किसनराव चारोस्कर यांचे निधन झाल्याने पोटनिवडणुकीत त्यांचे पुत्र रामदास चारोस्कर विधानसभेत जाऊन पोहोचले. पुढे १९९९च्या निवडणुकीत रामदास चारोस्कर यांनी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवित पुन्हा विजयश्री प्राप्त केली. त्यावेळी चारोस्कर यांनी शिवसेनेचे सोमनाथ गुंबाडे यांचा पराभव केला होता.
२००४च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून रामदास चारोस्कर यांच्याऐवजी नरहरी झिरवाळ यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे रामदास चारोस्कर यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढविली. मात्र, नरहरी झिरवाळ यांनी रामदास चारोस्कर यांचा मोठ्या मतांच्या फरकाने पराभव केला. झिरवाळ यांनी त्यावेळी ६१ हजार १२६ मते घेतली होती, तर चारोस्कर यांना ३१ हजार ६०३ मतांवर समाधान मानावे लागले होते.
२००९च्या निवडणुकीत राष्ट्रवादीने पुन्हा एकदा नरहरी झिरवाळ यांना रिंगणात उतरवले. मात्र यावेळी शिवसेनेने जनता दलाचे माजी खासदार हरिभाऊ महाले यांचे सुपुत्र धनराज महाले यांना उमेदवारी देत चुरस निर्माण केली. या चुरशीच्या सामन्यात धनराज महाले यांनी झिरवाळ यांचा पराभव केला; परंतु मताधिक्य होते ते अवघे १४९. अतिशय कमी मतांच्या फरकाने धनराज महाले यांचा निसटता विजय झाला.
२०१४च्या निवडणुकीत राष्ट्रवादीने तिसऱ्यांदा नरहरी झिरवाळ यांच्यावरच पुन्हा विश्वास टाकत उमेदवारी बहाल केली. यावेळी शिवसेनेने पुन्हा एकदा धनराज महाले यांना रिंगणात उतरवले. परंतु यावेळी नरहरी झिरवाळ यांनी बाजी मारत धनराज महाले यांना पराभूत केले. झिरवाळ यांनी ६८ हजार २८४, तर धनराज महाले यांनी ५५ हजार ६५१ मते मिळविली. याच निवडणुकीत रामदास चारोस्कर कॉँग्रेसकडून लढत तिस-या क्रमांकावर राहिले.
आता २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिंडोरी मतदारसंघात उलथापालथ झालेली आहे. लोकसभा निवडणुकीतच ही उलथापालथ होऊन राष्ट्रवादीच्या भारती पवार यांनी भाजपची वाट धरली होती. भारती पवार यांनी भाजपकडून उमेदवारी मिळवून आणत विजयही संपादन केला. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीकडून उमेदवारी करणारे धनराज महाले हे लोकसभेला पराभूत झाल्यानंतर पुन्हा स्वगृही परतले आहेत. त्यांच्या पाठोपाठ रामदास चारोस्कर यांनीही शिवबंधन हाती बांधले. त्यामुळे शिवसेनेकडून अगोदरपासून दावेदार असलेले जिल्हा परिषद सदस्य भास्कर गावित, सदाशिव गावित यांच्यात अस्वस्थता निर्माण झाली. आता शिवसेनेत दावेदार अधिक झाल्यामुळे तिकिटासाठी स्पर्धा वाढली असून, त्यातून बंडखोरीची चिन्हे आहेत.
शिवसेनेकडून कुणाला उमेदवारी मिळते, पक्षाकडून कोणालाही उमेदवारी मिळाली तरी सारे एकजुटीने राहिल्यास राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार नरहरी झिरवाळ यांच्या अडचणीत भर पडू शकते. शिवाय, दोनदा आमदारकी भुषवून देखील लक्षवेधी ठरू शकेल अशी एकही प्रकल्प त्यांना साकारता आलेला नाही. त्याबद्दल मतदारांत नाराजीचा सूर आहे. झिरवाळ यांची नजरेत भरेल अशी कामगिरी दिसत नाही. आदिवासी भाग असलेल्या मतदारसंघात अद्यापही आदिवासींच्या मूलभूत प्रश्नांचा निपटरा झालेला नाही. अनेक गावांना पक् के रस्ते-पूल नाहीत. सिंचनाच्या दृष्टीने ठोस प्रयत्न झालेले नाहीत. प्रकल्पग्रस्तांचेही प्रश्न प्रलंबित आहेत. त्यामुळे फारसा प्रभाव दाखवू न शकलेल्या झिरवाळांना पुन्हा उमेदवारी दिल्यास बारामतीनंतर सुरक्षित मतदारसंघ मानला जाणाºया दिंडोरीची जागा राखणे राष्ट्रवादीपुढे मोठे आव्हान उभे ठाकणार आहे.