उमेदवारी धोक्यात; भुजबळ पुत्राची हॅट्ट्रिक साधणार की हुकवणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2019 08:20 PM2019-09-20T20:20:38+5:302019-09-20T20:29:29+5:30

छगन भुजबळ यांनी येवल्यातून हॅट्ट्रिक केली आहे.

Vidhan Sabha 2019 : Pankaj Bhujbal will be hat-trick in nandgaon constituency? | उमेदवारी धोक्यात; भुजबळ पुत्राची हॅट्ट्रिक साधणार की हुकवणार?

उमेदवारी धोक्यात; भुजबळ पुत्राची हॅट्ट्रिक साधणार की हुकवणार?

Next

- धनंजय वाखारे

नाशिक : जिल्ह्यातील येवला मतदारसंघात छगन भुजबळ यांच्यासमोर स्वपक्षातूनच आव्हान उभे ठाकले असतानाच लगतच्या नांदगाव मतदारसंघातही त्यांचे सुपुत्र व विद्यमान आमदार पंकज भुजबळ यांच्या विरोधातही सूर उमटू लागल्याने पित्याबरोबरच पुत्राचीही उमेदवारी धोक्यात असल्याचे मानले जात आहे. त्यामुळे स्वत: येवल्यातून लढताना छगन भुजबळ आपल्या पुत्राची हॅट्ट्रिक साधणार की हुकवणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे.

२००४च्या विधानसभा निवडणुकीत छगन भुजबळ यांनी नाशिक जिल्ह्यातील येवला मतदारसंघाची निवड करत उमेदवारी केली आणि मोठ्या मताधिक्याने जिंकलीही. त्यानंतर २००९च्या निवडणुकीत त्यांनी पुन्हा येवल्यातून उमेदवारी करतानाच लगतच्या नांदगाव मतदारसंघातून आपले पुत्र पंकज यांचे राजकीय पदार्पण घडवून आणत त्यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी बहाल केली गेली. त्यावेळी ३६ वर्षांचे असलेल्या पंकज भुजबळ यांनी शिवसेनेचे संजय पवार यांचा २१ हजार ३६९ मतांनी पराभव केला होता. पंकज यांनी ९६ हजार २९२ मते मिळविली होती. त्यांच्या मतांची टक्केवारी ५३.३३ इतकी होती. त्यावेळी पंकज भुजबळ आणि संजय पवार यांच्यातच चुरशीचा सामना झाला होता.

२०१४च्या विधानसभा निवडणुकीत येवल्यातून पुन्हा तिसऱ्यांदा उमेदवारी करणा-या छगन भुजबळ यांनी नांदगाव मतदारसंघातून पुन्हा एकदा पंकज भुजबळांना रिंगणात उतरविले. छगन भुजबळ यांनी येवल्यातून हॅट्ट्रिक केली, तर पंकज भुजबळ हे दुसऱ्यांदा विधानसभेत जाऊन पोहोचले. या निवडणुकीत पंकज भुजबळ यांनी शिवसेनेचे सुहास कांदे यांचा १८ हजार ४३६ मतांच्या फरकाने पराभव केला होता. पंकज यांनी ६९ हजार २६३, तर सुहास कांदे यांना ५० हजार ८२७ मते मिळाली होती. भाजपचे अद्वय हिरे यांनी तिसºया क्रमांकाची मते घेत चुरस निर्माण केली होती.

आता होऊ घातलेल्या निवडणुकीत येवल्यातून छगन भुजबळ यांच्या विरोधात राष्ट्रवादीतूनच भुजबळ यांचे समर्थक अ‍ॅड. माणिकराव शिंदे यांनी उघडपणे उमेदवारीची मागणी करत छगन भुजबळांना थांबण्याचा सल्ला अप्रत्यक्षपणे दिला आहे. यापूर्वी २००९ मध्ये छगन भुजबळ आणि माणिकराव शिंदे हे आमने-सामने आले होते. त्यावेळी अपेक्षेप्रमाणे माणिकरावांचा पराभव झाला होता. मात्र, मागील निवडणुकीत माणिकरावांनी भुजबळांचे समर्थन करत त्यांच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला होता. आता मात्र, भुजबळांकडून आश्वासनपूर्ती न झाल्याचा आरोप करत माणिकरावांनी शड्डू ठोकले आहेत.

येवल्यात छगन भुजबळ यांना स्वपक्षातूनच विरोध सुरू झाला असतानाच नांदगाव मतदारसंघातूनही पंकज भुजबळ यांच्या विरोधात फटाके वाजू लागले आहेत. कॉँग्रेसच्या आजी-माजी पदाधिकाºयांमध्ये असंतोषाचे वातावरण असून, उघडपणे कुणीही मत व्यक्त करत नसले तरी भुजबळांना पुन्हा उमेदवारी देण्याबाबत उत्सुकता दिसून येत नाही. त्यातच शिवसेना-भाजप युती झाल्यास पंकज भुजबळांना मतदारसंघ सांभाळणे अवघड होऊन बसणार असल्याचे चित्र आहे.

आघाडीची सत्ता असताना छगन भुजबळ यांनी येवल्याबरोबरच नांदगावकडेही वैयक्तिक लक्ष घातले होते. काही विकासकामे मोठ्या भुजबळांच्या दबदब्यामुळेच झाल्याचे सांगितले जाते. मात्र, गेल्या पंचवार्षिक काळात विकास खुंटल्याचा आरोप विरोधकांकडून होत असून, खुद्द राष्ट्रवादी आणि कॉँग्रेसमध्येही नाराजीचा सूर आहे. त्यामुळे पंकज भुजबळांना हॅट्ट्रिक साधण्यासाठी पूर्वीपेक्षा जास्त मेहनत घ्यावी लागणार आहे.

Web Title: Vidhan Sabha 2019 : Pankaj Bhujbal will be hat-trick in nandgaon constituency?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.