विधानसभेची निवडणूक महायुतीसाठी अवघड :रामदास आठवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2019 05:19 PM2019-10-05T17:19:53+5:302019-10-05T17:24:40+5:30
भाजपा शिवसेनेसह विविध दहा घटक पक्षांच्या महायुतीत आरपीआयला किमान दहा जागा मिळणे अपेक्षित होते. परंतु, जागावाटपाचा तिढा सोडविताना आमच्या वाट्याला केवळ सहा जागा आल्याने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी असल्याचे सांगतनाच यावेळची विधानसभा निवडणूक युतीसाठी अवघड असल्याचे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे.
नाशिक :भाजपा शिवसेनेसह विविध दहा घटक पक्षांच्या महायुतीत आरपीआयला किमान दहा जागा मिळणे अपेक्षित होते. परंतु, जागावाटपाचा तिढा सोडविताना आमच्या वाट्याला केवळ सहा जागा आल्याने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी असल्याचे सांगतनाच यावेळची विधानसभा निवडणूक युतीसाठी अवघड असल्याचे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी शनिवारी (दि.४) पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले आहे.
महायुतीच्या जागावाटपात आपण देवळाली, भूसावळसह आणखी काही जागांची मागणी केली होती. परंतु, उत्तर महाराष्ट्रात आम्हाला एकही जागा मिळाली नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये आरपीआयवर अन्याय झाल्याची भावना पसरल्याने प्रचंड नाराजी असल्याचे रामदास आठवले यांनी सांगितले. महायुतीत आरपीआयला किमान १० जागा मिळण्याची अपेक्षा होती. मात्र आमच्या वाट्याला केवळ सहा जागा आल्या आहेत. त्यातही मुंबईतील मानखुर्द शिवाजीनगर मतदार संघातून शिवसेने उमेदवार दिला आहे.त्यामुळे आमच्या वाट्याला केवळ पाच जागा येणार असल्याने या जागेचा तिढा सोडविण्यासाठी आपण उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, आपल्यावर अन्याय होत असला तरी सत्तेत सहभाही होऊन अन्याय दूर करता येणार असल्याचे सांगतानाच आपल्या वाट्याला आलेल्या सर्व जागा जिंकण्यासाठीच आपण भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढविणार असल्याचे त्यांनी सांगितले.
युतीत नेहमीच गडबड
भाजप आणि शिवसेनेदरम्यान विविध मुद्द्यावरील मतभेद सर्वश्रृत असून गतपंचवार्षिकमध्ये दोन्ही पक्ष सत्तेत असतानाही ते प्रकर्षाने दिसून आले असताना युतीत नेमहीच गडबड असल्याचे सांगतानाच आपणच मध्यस्थी करून ही गडबड दूर करण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे रामदास आठवले यांनी स्पष्ट केले. तसेच शिवशक्ती आणि भीमशक्तीच्या एकत्रीकरणाची कल्पनाही बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत आपणच आणल्याने आज समाजात परिवर्तन दिसून येत असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.